- श्रीकांत जाधवमुंबई : उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांनी भाजपच्या ॲड. उज्ज्वल निकम यांचा पराभव केला. अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीत गायकवाड यांची सरशी झाल्यानंतर विजयाचे श्रेय त्यांनी मतदारांना दिले. त्यांच्याशी झालेल्या चर्चेचा सारांश...
तुमच्या मतदारसंघातील कोणते मुख्य प्रश्न तुम्ही संसदेत मांडणार? संरक्षण खात्याच्या जमिनीवरील घरांच्या पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर आहे. एअर इंडिया कॉलनीतील रहिवाशांच्या समस्या मोठ्या आहेत. तसेच माझ्या मतदारसंघात झोपडपट्टी पुनर्वसनाचे अनेक प्रकल्प रखडले आहेत. मिठी नदीचे प्रदूषण, विस्तार, महामार्गावरील वाहतूक कोंडीचाही प्रश्न आहे. यापैकी काही प्रश्न संसदेत मांडावे लागणार आहेत.
राज्यातील कोणते महत्त्वाचे प्रश्न दिल्लीत लावून धरणार? केंद्रातील भाजपप्रणीत एनडीए सरकारने महाराष्ट्राच्या विकासाकडे नेहमीच दुर्लक्ष केले. परिणामी, अनेक प्रकल्प रखडले आहेत. उद्योग-रोजगार बाहेर जात आहेत. चारशे पारचा नारा देत संविधान बदलण्याचे कारस्थान रचण्यात आले आहे. त्यामुळे सर्व धर्मीयांच्या प्रश्नांसाठी आणि संविधानाच्या रक्षणासाठी मी दिल्लीत आवाज उठवेन.
मतदारसंघासाठी तुमची स्वतःची अशी ‘ब्लू प्रिंट’ वगैरे तयार आहे का? प्रामुख्याने मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवूनच मी प्रचार केला. जाहीरनाम्यातही आम्ही स्थानिक प्रश्नांना प्राधान्य दिले आहे. महत्त्वाच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी कृती आराखडा तयार केला जाईल.
आमदार, मंत्री म्हणून काम केल्यानंतर आता खासदार म्हणून कोणती आव्हाने तुमच्या समोर आहेत? राज्यात मंत्रिपदावर काम करण्याचा मला अनुभव आहे. येथील नागरी प्रश्नांची जाण आहे. त्याचबरोबर केंद्राकडून महाराष्ट्राला काय अपेक्षित आहे, हे मला माहीत आहे. त्यामुळे खासदार म्हणून काम करणे फारसे आव्हानात्मक असेल, असे मला वाटत नाही. पुढील पाच वर्षांसाठी काही अजेंडा आहे का? मतदारसंघात अनेक जटिल प्रश्न आहेत. आधीच्या लोकप्रतिनिधींनी फारसे लक्ष दिले नाही. आता मतदारांनी विश्वासाने महाविकास आघाडीला संधी दिली आहे. त्यामुळे लोकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवण्यासाठी लवकरच एक ठोस कृती कार्यक्रम हाती घेतला जाईल. उमेदवारीला पक्षांतर्गत विरोध झाला, आता पक्षातील नाराजांबरोबरच मित्रपक्षांना सांभाळून घेताना तारेवरची कसरत करावी लागेल, असे वाटते का? माझ्या उमेदवारीनंतर पक्षांतर्गत इच्छुकांनी नाराजी व्यक्त करणे साहजिकच होते. मात्र, प्रचारात त्यांनी मला साथ दिली. त्यांच्या मतदारसंघातून चांगली मते मला मिळाली. याचाच अर्थ ते माझ्याबरोबर आहेत आणि आम्ही यापुढेही एकत्र मिळून काम करू.