Join us

नववीतल्या विद्यार्थ्यांनी सोनसाखळी चोरास पकडले

By admin | Published: July 26, 2015 3:32 AM

महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी घेऊन पळ काढणाऱ्या सराईत सोनसाखळी चोरट्याला चार अल्पवयीन मुलांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.

मुंबई: महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी घेऊन पळ काढणाऱ्या सराईत सोनसाखळी चोरट्याला चार अल्पवयीन मुलांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. ही घटना शुक्रवारी सकाळी चेंबूर परिसरात घडली. पोलिसांसह शाळेतील शिक्षकांनी या धाडसी मुलांचे कौतुक केले. गोवंडी परिसरात राहणारी निता कांबळे ही महिला शुक्रवारी सकाळी साडे-सहाच्या सुमारास नेहमीप्रमाण्े कामावर जात होती. चेंबूरच्या लोखंडे मार्गावरुन जात असताना अश्रफ शेख (२१) या चोरट्याने महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी घेऊन पळ काढला. ही बाब लक्षात येताच महिलेने तत्काळ आरडाओरडा केला. त्याचवेळी लोखंडे मार्ग परिसरात राहणारे अजय पाटील, विजय पाटील, सलमान खान आणि अनिल साठे ही मुले याच मार्गावरुन शाळेत जात होती. पाठीमागून महिला चोर-चोर असे ओरडत असल्याचे या मुलांना समजताच त्यांनी या चोरट्याचा पाठलाग केला. काही अंतर पुढे जाताच सलमान आणि अजयने या चोरट्याला पकडले. यावेळी चोरट्याने त्यांना हिसका देऊन पळण्याचा प्रयत्न केला. मात्र विजय आणि अनिल देखील त्यांच्या मदतीला धावून आल्याने त्यांनी या चोरट्याला पकडून बाजूलाच असलेल्या टिळक नगर पोलीस बीट चौकीत नेले. त्यानंतर पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरुन या चोरट्यावर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. लोखंडे मार्गावरील पालिका शाळेत शिकणाऱ्या या मुलांनी केलेल्या कामगिरी बद्दल पोलिसांनी त्यांचे कौतूक केले आहे. तसेच शाळेतील शिक्षकांना देखील याची माहिती मिळताच त्यांनी देखील या मुलांचा सत्कार केला आहे. ही चारही मुले गरीब घरातील असून दुपारी शाळेत व त्यानंतर दुकानात तसेच गॅरेजमध्ये काम करुन आई-वडीलांना मदत करतात. (प्रतिनिधी)