Join us

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी नवदाम्पत्य सरसावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2021 4:07 AM

मनोहर कुंभेजकरलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे लग्नाला फक्त २५ माणसे असावीत आणि लग्न ...

मनोहर कुंभेजकर

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे लग्नाला फक्त २५ माणसे असावीत आणि लग्न सोहळा दोन तासात संपला पाहिजे, अशी नियमावली आहे. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जारी केलेल्या याच कोरोना नियमावलीचे पालन करत मुंबई महानगरपालिकेचे विधी व महसूल समिती अध्यक्ष व प्रभाग क्रमांक ६चे शिवसेना नगरसेवक हर्षद कारकर यांनी त्यांचा विवाह सोहळा मोजून २५ माणसांमध्ये साधेपणाने नुकताच साजरा केला. त्यांचे लग्न २२ एप्रिल रोजी झाले, त्यावेळी मुंबईसह या प्रभागात कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त होता. या नवदाम्पत्याने हनिमूनला जाण्याऐवजी प्रभागात सतर्क राहून येथील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यात मोलाची भूमिका बजावली.

लग्नाला वडीलधारे म्हणून म्हाडाचे सभापती व शिवसेना उपनेते डॉ. विनोद घोसाळकर उपस्थित होते. उच्चशिक्षित असलेले हर्षद कारकर हे २०१७च्या पालिका निवडणुकीत वयाच्या २२ व्या वर्षी नगरसेवक म्हणून मोठ्या मताधिक्याने निवडून आले. लग्नानंतर हनिमूनला न जाता या नवदाम्पत्याने आपल्या प्रभागातच थांबून येथील नागरिकांना बेड मिळवून देणे, नागरिकांना, ज्येष्ठ नागरिकांना लसीकरणात मदत करणे, गरजू नागरिकांना ऑक्सिजन मिळवून देणे, नालेसफाईच्या कामाची पाहणी करणे, नागरी समस्या जाणून त्या सोडवणे या कामाला विशेष महत्त्व दिले. त्यासाठी हर्षद कारकर आणि त्यांच्या पत्नी दीक्षा संखे-कारकर हे दोघेही रस्त्यावर उतरले आणि त्यांनी येथील नागरिकांना दिलासा दिला.

हर्षद यांचे वडील प्रकाश कारकर यांचे गेल्यावर्षी ९ ऑक्टोबरला निधन झाले. त्यापूर्वी ७ ऑक्टोबरला त्यांची विधी समिती अध्यक्षपदी निवड झाली हाेती. प्रकाश कारकर हे २००२ ते २०१२पर्यंत नगरसेवक होते तर २०१५ ते २०१७पर्यंत ते विभाग क्रमांक १ चे विभागप्रमुख होते. वडिलांच्या निधनाचे दुःख बाजूला सारत एकीकडे विधी व महसूल समिती अध्यक्षपदाची धुरा हर्षद यांनी सांभाळली तर दुसरीकडे प्रभागात लगेचच जोमाने कामाला सुरुवात केली. आता त्यांची पत्नी दीक्षा यादेखील प्रभाग क्रमांक ६ कोरोनामुक्त करण्यासाठी हर्षद यांना मोलाचे सहकार्य करत आहेत. रस्त्यावर उतरून कोरोनामुक्तीसाठी काम करणाऱ्या या नवदाम्पत्याचे सध्या प्रभागात कौतुक होत आहे.

----------------------------------------