मुंबई : विधिमंडळात प्रश्न दडपण्यासाठी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पैसे घेतल्याचा आरोप करणारे वृत्त प्रसारीत केल्याबद्दल ‘न्यूज १८ लोकमत’ या मराठी वृत्तवाहिनीवर विधान परिषदेत राष्ट्रवादीतर्फे हेमंत टकले यांनी हक्कभंग प्रस्ताव मांडला. सभापती रामराजे निंबाळकर यांनी तो दाखल करून घेत विशेषाधिकर समितीने अधिवेशन संपण्यापूर्वी यावर निर्णय घ्यावा, असा आदेश दिला.एचडीआयल या बांधकाम कंपनीसंबंधी लक्षवेधी विधिमंडळात येऊ नये, यासाठी पैशाची देवाणघेवाण करण्याबाबतची ध्वनिफित ‘न्यूज १८ लोकमत’ वृत्त वाहिनीवर दाखविण्यात आली होती. यात धनंजय मुंडे यांचा नावाचा उल्लेख आहे. यावृत्तावरून गुरुवारी विधानपरिषदेत प्रचंड गदारोळ झाला. या प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्र्तींमार्फत या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी सर्वपक्षीय सदस्यांनी केली.भाई गिरकर, सुरजितसिंग ठाकूर, प्रवीण दरेकर या भाजपा सदस्यांनी या प्रकरणी न्यायालयीन चौकशीची मागणी केली. या वृत्तामुळे सभागृहाच्या कार्यपध्दतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून हा विधिमंडळाचा अवमान असल्याचे शिवसेनेचे अनिल परब यांनी सांगितले. राष्टÑवादीचे सुनील तटकरे यांनी विधिमंडळाच्या दृष्टीने हा काळा दिवस असल्याचे सांगत सरकारच्या विरोधात धनंजय मुंडे यांनी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे त्यांच्यावर जाणीवपूर्वक हे आरोप केले जात आहेत, असा आरोप केला.तर धनंजय मुंडे यांना नोटीस न देता त्यांच्याविषयी विधानसभेत कोणत्या अधिकारात प्रश्न उपस्थित केले गेले? असा आक्षेप काँग्रेसचे शरद रणपिसे यांनी घेतला. शिवसेनेच्या निलम गोºहे, शेकापचे जयंत पाटील, राष्टÑवादीचे अमरसिंह पंडीत, विद्या चव्हाण, हेमंत टकले, रिपाइंचे योगेंद्र कवाडे, जनता दलाचे कपिल पाटील यांनीही आपापली मते मांडली.
‘न्यूज १८-लोकमत’वर हक्कभंग, वाहिनीवरील वृत्तावरून गदारोळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2018 3:51 AM