समाजमाध्यमांवर व्हायरल होत असलेली ‘ती’ बातमी खोटी; विद्यापीठाचे स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2020 02:05 AM2020-03-24T02:05:34+5:302020-03-24T02:07:39+5:30
पहिलीपासून ते आठवीपर्यंतच्या परीक्षा रद्द या बातमीचे संपादन होऊन त्याऐवजी पहिलीपासून ते पंधरावी पर्यंतच्या सर्व परीक्षा रद्द व मुंबई विद्यापीठाच्या सर्व परीक्षा रद्द होऊन सर्वांना पुढील वर्गात प्रवेश, अशी चुकीची बातमी समाजमाध्यमावर सध्या फिरत आहे.
मुंबई : विद्यापीठाच्या सर्व परीक्षा रद्द होऊन सर्वांना पुढील वर्गात प्रवेश अशी चुकीची बातमी सध्या समाजमाध्यमावर व्हायरल होत आहे. मात्र सदरची बातमी खोटी असून राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाच्या २०२० च्या उन्हाळी सत्राच्या सर्व परीक्षा रद्द झालेल्या नसून त्या ३१ मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत, असे स्पष्टीकरण मुंबई विद्यापीठाकडून देण्यात आले आहे.
पहिलीपासून ते आठवीपर्यंतच्या परीक्षा रद्द या बातमीचे संपादन होऊन त्याऐवजी पहिलीपासून ते पंधरावी पर्यंतच्या सर्व परीक्षा रद्द व मुंबई विद्यापीठाच्या सर्व परीक्षा रद्द होऊन सर्वांना पुढील वर्गात प्रवेश, अशी चुकीची बातमी समाजमाध्यमावर सध्या फिरत आहे. मात्र या बातमीत तथ्य नसून शासनाच्या निर्देशानुसार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २३ मार्च २०२० पासून होणाऱ्या सर्व परीक्षा ३१ मार्च २०२० पर्यंत पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. तसे परिपत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर टाकण्यात आलेले आहे. या परीक्षा रद्द झालेल्या नाहीत तर पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. विद्यापीठ परीक्षा व इतर महत्वाच्या सूचना विद्यापीठाच्या संकेतस्थळावर तात्काळ प्रसिद्ध करीत असते. विद्यार्थ्यांनी या संकेतस्थळाला भेट द्यावी. समाजमाध्यमावरील अशा चुकीच्या बातम्या दुसºयास पाठवू नयेत. शासनाच्या निर्देशानुसार परीक्षेच्या नवीन तारखा जाहीर केल्या जातील. त्या तारखा संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्या जातील, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी सांगितले.