मुंबई - मुंबईकरांची तहान भागवणारी मुंबईतील चारही धरणं 100 टक्के भरली आहेत. सोमवारी दिवसभर झालेल्या रिमझीम पावसानंतर मुंबईला पाणीपुरवठा करणारं तानसा हे चौथं धरणही आज पहाटे भरलं आहे. त्यामुळे यंदाही मुंबईकरांचा पाणीप्रश्न मार्गी लागणार आहे. जिल्हा प्रशासनाकडून तानसा धरणाचे 9 आणि 10 क्रमांकाचे दोन दरवाजे उघडण्यात आले असून नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच मुंबईसह परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणारी तुळशी, मोडकसागर आणि विहार ही धरणं ओव्हरफ्लो झाली आहेत. त्यानंतर आज पहाटे तानसा धरणंही 100 टक्के भरले. त्यामुळे या धरणातील पाणीसाठा कमी करण्यासाठी 9 व 10 क्रमांकाची दोन दरवाजे उघडण्यात आली आहेत. सोमवारी मोडक सागर धरण 100 टक्के भरल्यानंतर त्याचेही 2 दरवाजे उघडण्यात आले होते. मुंबईतील पावसामुळे गेल्या दोन दिवसांत धरणातील जलसाठा तब्बल सव्वादोन लाख दशलक्ष लीटरने वाढला आहे. तुळशी, मोडकसागरपाठोपाठ सोमवारी सकाळी विहार तलावही भरुन वाहिला. तर आज तानसा धरण भरल्याने यंदाच्या उन्हाळ्यातील मुंबईकरांचा पाणीप्रश्न मार्गी लागणार आहे. दरम्यान, तानसा तलावातून मुंबईला दररोज 110 दशलक्ष लीटर जलसाठा पुरविण्यात येतो.
पाहा व्हिडिओ - तानसा धरण