मुंबई : सुस्त कारभाराची झाडाझडती घेण्यासाठी महापालिका आयुक्त अजय मेहता मैदानात उतरताच अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. कुर्ला, अंधेरी व कांदिवली विभागातील बेकायदा बांधकामांचे पितळ अचानक केलेल्या पाहणीत उघडे पडले. याची दखल घेऊन आयुक्तांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर या विभागातील साहाय्यक आयुक्तांची झोप उडाली व ऐन निवडणुकीच्या मोसमातही बेकायदा बांधकामांवरील कारवाईने वेग घेतला आहे.मुंबईतील १४ फुटांपेक्षा उंच झोपड्यांवर कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी दोन महिन्यांपूर्वी दिले. परंतु पुढच्या वर्षी महापालिकेची निवडणूक असताना ‘व्होट बँके’वरील कारवाई नगरसेवकांना मान्य नाही. याचा दबाव स्थानिक पातळीवर अधिकाऱ्यांवरही पडत आहे. मात्र आयुक्तांनी कामगिरी दाखवून द्या, अशी तंबीच अधिकाऱ्यांना दिली आहे. तरीही कुर्ला, अंधेरी, कांदिवली विभाग सुस्तच होते. अखेर आयुक्तांनी या विभागांमध्ये पाहणी केली असता हा सुस्त कारभार चव्हाट्यावर आला. उपायुक्तांच्या बैठकीत आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर या तीन विभागांत अनधिकृत बांधकामांविरोधात जोरदार कारवाई सुरू झाली आहे. शुक्रवारी दिवसभरात १७१ बांधकामे व अतिक्रमणे तोडण्यात आली आहेत. (प्रतिनिधी)
आयुक्तांनी घेतला अधिकाऱ्यांचा समाचार
By admin | Published: December 24, 2016 3:45 AM