मुंबई: कोरोनाच्या संकटानंतर यंदा प्रथमच दिवाळी आनंदात आणि उत्साहात साजरी केली जातेय. नागरिकांचं झालेलं लसीकरण आणि कोरोना रुग्णांची कमी झालेली संख्या यामुळे सर्वत्र दुधात साखर पडल्याचं चित्र दिसून येतंय. न्यूज18 लोकमत आपल्या प्रेक्षकांसाठी ‘दीपोत्सव’ हा दिवाळीचा सांगीतिक फराळ घेऊन आलाय. दिवाळीचे तीनही दिवस विविध कार्यक्रमांची रेलचेल न्यूज18 लोकमतच्या प्रेक्षकांना ‘दीपोत्सव’ मध्ये अनुभवता येणार आहे.
दिवाळीच्या पहिल्या दिवसाची सुरुवात नादनिधी या कार्यक्रमाने झाली. या कथ्थक नृत्यांगना निधी प्रभू आणि त्यांच्या टीमनं दिवाळीच्या प्रत्येक दिवसाचं महत्व नाच आणि गाण्यातून आगळ्यावेगळ्या पध्दतीने सादर केलं. यानंतर ‘90 बासरीवादकांनी सादर केलेला ‘अर्पण’ या कार्यक्रमाचा आस्वाद प्रेक्षकांना घेता येणार आहे. वयाच्या 6 वर्षापासून ते 65 वर्षापर्यंतचे कलाकार या कार्यक्रमात सहभागी असून, या सर्व कलाकारांनी विविध मराठी, हिंदी गीतांसह अनेक रागही बासरीच्या माध्यमातून सादर केलेत. शास्त्रीय संगीताची आवड असणाऱ्या दर्दी प्रेक्षकांसाठी ‘अर्पण’ हा कार्यक्रम पर्वणीच असणार आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या कलाकारीनं प्रेक्षकाचं निखळ मनोरंजन करणाऱ्या प्रशांत दामले, कविता लाड यांच्या दिलखुलास गप्पांनी प्रेक्षकांची मने जिंकलीत. प्रशांत दामलेंचं मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं हे गाणं कसं जन्मला आलं? रागदारीचं प्रशिक्षण नसतानाही प्रशांत दामले गाणं सुरात कसे गायचे याचे किस्सेही प्रेक्षकांना ऐकायला मिळतील. अभिनेता सुबोध भावेचं लव्ह अरेंज मॅरेज आणि त्याच्या पत्नींची सुबोधविषयी असलेली तक्रार सुध्दा कळणार आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने लग्नानंतरची पहिली दिवाळी सुद्धा प्रेक्षकांना शुक्रवारी अनुभवता येणार आहे. नेहमीच्या कविता मैफिलीपेक्षा प्रेक्षकांना काहीतरी वेगळं देण्याचा मानस ‘न्यूज18 लोकमत’चा होता.
वर्ल्ड व्हिसलिंग चॅम्पियन हा किताब पटकावणारा निखिल राणे आणि त्याचा 'बे एके बे' नावाचा वाद्यवृंद हे सुद्धा यंदाच्या दिवाळीचं वैशिष्ट्य ठरणार असून, निखिलने आपल्या शिट्टीमधून अनेक मराठी हिंदी गाणी ऐकवत बहार आणली. इतकंच नाही तर यंदा आम्ही वर्दीतल्या कलाकारांसोबतही दिवाळी साजरी केली. त्यासाठी बृहन्मुंबई पोलीस दलातील मान्यवर उपस्थित राहिले. त्यांनीही त्यांच्या कविता आणि गाण्यांच्या सादरीकरणाने न्यूज18 लोकमतच्या दीपावली विशेष कार्यक्रमात 'खाकी'चा नवा रंग भरला. याशिवाय, विस्मृतीत गेलले पदार्थसुध्दा शेफ तुषार देशमुख यांच्याकडून शिकता येणार आहेत. दिवाळीच्या प्रत्येक दिवसाचं महत्व आणि त्यानुसार करायची पूजा याचं मार्गदर्शनसुध्दा महिला पुरोहित मृदुला बर्वे यांनी केलंय. ‘दीपोत्सव’मधे सर्वच प्रकारच्या कार्यक्रमाची गुंफण असल्यामुळे खऱ्या अर्थाने ‘दीपोत्सव’ प्रेक्षकांच्या आयुष्यात आनंदाचे रंग भरेल, असे म्हटले जात आहे.