वस्तीतल्या मुलांनी सर्वेक्षण करून बनविले न्यूजलेटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2018 05:41 AM2018-08-16T05:41:20+5:302018-08-16T05:41:31+5:30

समाजाच्या बाबतीतला मुलांचा दृष्टीकोन, त्यांना त्यात हवे असणारे बदल, त्यांना जाणवणाऱ्या समस्या या इतरांपेक्षा वेगळ्या असू शकतात. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने रोझमेरी इंग्लिश हायस्कूल आणि वाचा संस्थेतील मुलांनी एकत्र येत, याच संदर्भात ‘आरोग्य’ हा महत्त्वाचा विषय घेऊन न्यूजलेटर काढले आहे.

Newsletter made by surveyed children surveyed | वस्तीतल्या मुलांनी सर्वेक्षण करून बनविले न्यूजलेटर

वस्तीतल्या मुलांनी सर्वेक्षण करून बनविले न्यूजलेटर

Next

- सीमा महांगडे
मुंबई - समाजाच्या बाबतीतला मुलांचा दृष्टीकोन, त्यांना त्यात हवे असणारे बदल, त्यांना जाणवणाऱ्या समस्या या इतरांपेक्षा वेगळ्या असू शकतात. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने रोझमेरी इंग्लिश हायस्कूल आणि वाचा संस्थेतील मुलांनी एकत्र येत, याच संदर्भात ‘आरोग्य’ हा महत्त्वाचा विषय घेऊन न्यूजलेटर काढले आहे. यामध्ये मेव्हणी परिसरातील १०० लोकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. तेथील लेप्टोस्पायरसीस आणि क्षयासारख्या रोगांवर, त्यामुळे उद्भवणाºया समस्यांवर त्यांनी लक्ष वेधले. सोबतच तेथील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत नागरसेविकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्नही न्यूजलेटरमधून केला आहे.
३० वर्षांपासून महिलांसाठी कार्यरत वाचा संस्थेने गेल्या १५ वर्षांपासून वस्त्यांमध्ये जाऊन तेथील मुलींसाठी काम करण्यास सुरुवात केली. तेथे इंग्रजी आणि कॉम्प्यूटर शिक्षण या भविष्यासाठी महत्त्वाच्या असणाºया दोन विषयांचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. सध्या शहरातील १५ ते १७ ठिकाणी या संस्थेच्या कार्यशाळा असून, मालवणी येथे एक शाखा आहे. न्यूजलेटर हे विद्यार्थ्यांना देण्यात येणाºया प्रशिक्षणाचा महत्त्वाचा भाग असून, विद्यार्थ्यांना त्यांच्या आसपासच्या परिसरात स्वत: भेट देणे, तेथील परिस्थितीचा आढावा घेणे, स्वत:ची मते मांडणे, सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, लेटरसाठी स्वत: टाइपिंग करणे, बातम्या एडिट करणे, ४ पानांसाठी स्वत: जाहिरात आणणे आणि यातून मुलांमध्ये संवाद, मार्केटिंगचे कौशल्य विकसित करणे, यावर भर देण्यात येत असल्याची माहिती प्रकल्प समन्वयक रूपाली पेठकर यांनी दिली.
मालवणीत मुलांनी तयार केलेल्या न्यूजलेटरनंतर त्यांनी त्या परिसरात रॅलीही काढली. त्याद्वारे लोकांशी संवाद साधला. शिवाय तेथील स्थनिक नगरसेविका सलमा अलमेलकर यांच्याशी संवाद साधला. त्यांनी मुलांना तेथील ११ रस्त्यांना मंजुरी मिळाली असून, लवकरच त्यांचे काम करणार असल्याचे आश्वासन दिले, तसेच लवकरच त्या परिसरात कचरापेट्या, स्वच्छतागृहांची सोय करणार असल्याची माहिती दिली.
ही मुले स्वत:च्या विकासासोबत जनजागृती करून सामाजिक कार्यही करत असल्याची माहिती वाचाच्या समन्वयक अनघा सावंत यांनी दिली. मुलीने जुजबी शिक्षण घेऊन घरातील धुणीभांडी करावीत, लग्न करून दिले की, तिने सासरच्या मंडळींच्या इच्छेनुसार संसार करावा, अशी मानसिकता चाळ, झोपडपट्टी भागात राहणाºया कुटुंबांमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून येते. या मानसिकतेत काही सकारात्मक बदल घडावेत, यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

नेतृत्व विकासावर भर...
मुलींमधील जाणिवा, जागरूकता, कौशल्य, नेतृत्व विकसित करणे, तसेच मुलगा-मुलगी समानतेचे शिक्षण देणे हे या कार्यक्रमाचे उद्दीष्ट आहे. घरात मुलगा, मुलगी असा भेद करण्यात येत असेल, तर तो कसा चुकीचा आहे हे कुटुंबीयांना पटवून दिले जाते. या उपक्रमात मुलांनाही सहभागी करून घेतले जाते. मुला-मुलींना एका व्यासपीठावर आणून त्यांच्यात चर्चा घडविणे, सामाजिक संदेश देणारी पथनाट्ये सादर करणे, मुलींना आत्मनिर्भरतेचे धडे देणे, दररोजची वर्तमानपत्रे, मासिकांचे वाचन करणे, वाचनालय, अभ्यासिकेचा नियमित वापर, पालकसभा, पोलीस, पत्रकार, सरकारी कार्यालये, बँकांना भेटी देणे असे विविधांगी मार्गदर्शन प्रात्यक्षिकासह केले जाते, असे रूपाली पेठकर यांनी सांगितले.

Web Title: Newsletter made by surveyed children surveyed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.