वृत्तपत्र विक्रेत्यांनी मानले शरद पवार यांचे आभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:05 AM2021-04-03T04:05:27+5:302021-04-03T04:05:27+5:30
सुप्रिया सुळे यांना संघटनेच्या वतीने दिले निवेदन लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोना काळातही वर्तमानपत्र घेऊन वाचण्यात कोणताही धोका ...
सुप्रिया सुळे यांना संघटनेच्या वतीने दिले निवेदन
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोना काळातही वर्तमानपत्र घेऊन वाचण्यात कोणताही धोका नाही, हे जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर करूनही आज काही प्रमाणात वर्तमापत्राबाबत गैरसमज होत असतानाच खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा रुग्णालयातील वर्तमानपत्र वाचतानाचे छायाचित्र आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. त्यामुळे वर्तमानपत्र सुरक्षित आहे हा संदेश जनमाणसात गेला. वर्तमानपत्राबाबत गैरसमज दूर होण्यास यानिमित्ताने मदत झाली. त्यानिमित्त वृत्तपत्र विक्रेत्यांनी शरद पवार यांचे सुप्रिया सुळे यांच्याकडे आभार मानले, तसेच वृत्तपत्र विक्रेत्यांच्या विविध समस्यांबाबत निवेदन दिले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची वेळ घेऊन लवकरात लवकर आपल्या समस्यांसंदर्भात बैठक बोलाविण्यात येईल, असे आश्वासन सुप्रिया सुळे यांनी वृत्तपत्रविक्रेत्यांना दिले. यावेळी मुंबई-ठाणे एकीकरणचे प्रमुख अजित पाटील, बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघाचे विश्वस्त जीवन भोसले, दादर वृत्तपत्र विक्रेता संघाचे सुशांत वेंगुर्लेकर व कल्याण वृत्तपत्र विक्रेता संघाचे घनश्याम यादव उपस्थित होते.