Join us

वृत्तपत्रविक्रेत्यांना लवकरच शासकीय योजनाचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 4:06 AM

मुंबई : देशभरातील सर्व वृत्तपत्र विक्रेत्यांना असंघटित कामगाराप्रमाणे शासनाच्या सर्व योजनांचा लाभ देऊ, असे आश्वासन केंद्रीय श्रममंत्री संतोष गंगवार ...

मुंबई : देशभरातील सर्व वृत्तपत्र विक्रेत्यांना असंघटित कामगाराप्रमाणे शासनाच्या सर्व योजनांचा लाभ देऊ, असे आश्वासन केंद्रीय श्रममंत्री संतोष गंगवार यांनी ऑल इंडिया न्यूज पेपर डिस्ट्रिब्यूटर असोसिएशनच्या प्रतिनिधी मंडळाला दिले. लवकरच फक्त वृत्तपत्रविक्रेत्यांसाठी काय काय योजनांचा लाभ देता येईल. या योजना कशाप्रकारे कार्यान्वित करता येईल याबद्दल लवकरच एक सविस्तर बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल. या बैठकीला ऑल इंडिया न्यूज पेपर डिस्ट्रिब्यूटर असोसिएशनच्या प्रतिनिधी मंडळाला बोलावण्यात येईल, असे आश्वासनदेखील त्यांनी दिले.

मंगळवारी सकाळी दिल्ली येथील श्रमशक्ती भवन मध्ये केंद्रीय श्रममंत्री संतोष गंगवार यांच्याबरोबर ऑल इंडिया न्यूज पेपर डिस्ट्रिब्यूटर असोसिएशनच्या प्रतिनिधी मंडळाची बैठक झाली. बैठकीत राष्ट्रीय सल्लागार आमदार संजय केळकर, चेअरमन संजीव केरनी, अध्यक्ष बब्बरसिंग चौहान, दत्ता घाडगे, मुनिष अहमद, आतीफ खान, पिंटू रावल उपस्थित होते. वृत्तपत्रविक्रेत्यांना काय काय योजनांचा लाभ घेता येईल यावर चर्चा करण्यात आली. देश स्वतंत्र होण्यासाठी क्रांतिकारी विचार लोकांपर्यंत पोहचविण्याचे काम विक्रेत्यांनी वृत्तपत्र घरोघरी पोहोचवून केले होते. आता करत आहेत. मात्र शासनाकडून यांना कोणत्याही सोयी-सुविधा मिळत नाहीत हा मुद्दा कामगारमंत्री यांच्या समोर मांडला. केंद्र शासनाने १५ ऑक्टोबर हा वृत्तपत्रविक्रेता दिन म्हणून अधिकृत जाहीर करावा, अशी मागणी संजय केळकर यांनी केली.

असंघटित क्षेत्रातील कामगारांना ज्याप्रमाणे सरकारकडून सुविधा मिळणार आहेत त्याचप्रमाणे वृत्तपत्रविक्रेत्यांना सामाजिक सुरक्षा अधिनियमांतर्गत सर्व योजनांचा लाभ मिळावा. वृत्तपत्रविक्रेत्यांच्यासाठी राष्ट्रीय पातळीवर किंवा प्रत्येक राज्यात एक वेगळे कल्याणकारी महामंडळ बनविले पाहिजे, अशी मागणी प्रतिनिधी मंडळाकडून केली गेली. सर्व वृत्तपत्रविक्रेत्यांची नोंदणी शासनाकडून करून घेऊन या सर्व योजनांचा फायदा देशभरातील सर्व वृत्तपत्रविक्रेत्यांना मिळवा, अशी मागणी केली गेली.