“पुढील १५ दिवस टोलनाक्यांवर सरकार आणि मनसेकडून व्हिडिओग्राफी होणार”
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2023 10:48 AM2023-10-13T10:48:08+5:302023-10-13T10:49:07+5:30
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील टोलनाक्यावर चारचाकींना टोल नाहीत असं विधान आले. त्यामुळे लोकांमध्ये संभ्रमावस्था तयार झाली. सरकार टोल वसूल करत नाही मग हे पैसे जातात कुठे? असा प्रश्न निर्माण झाला होता असं त्यांनी म्हटलं.
मुंबई – टोल घेणार असाल तर लोकांना कोणकोणत्या सुविधा दिल्या आहेत त्याचा उल्लेख करारात आहे परंतु अंमलबजावणी झाली नाही. प्रत्येक शहरात दर दिवसाला वाहनसंख्या वाढतेय. परंतु टोलवरून किती वाहने जातात याचा आकडा नाही. त्यामुळे सरकारने पुढील १५ दिवस सर्व एन्ट्री पाँईटवर कॅमेरा लागतील. त्यासोबत आमचेही कॅमेरा लागतील. त्यात वाहने किती जातायेत, हे नागरीक म्हणून आपल्याला कळेल. टोलनाक्यांवर व्हिडिओग्राफी केली जाईल असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. शिवतीर्थ निवासस्थानी झालेल्या मंत्री दादा भुसे आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं.
या पत्रकार परिषदेत राज ठाकरे म्हणाले की, टोलबाबत मुख्यमंत्र्यासोबत काल सह्याद्री गेस्ट हाऊसला बैठक झाली. त्यात काही गोष्टी ठरल्या परंतु लेखी स्वरुपात काही आले नव्हते. त्यानंतर आज बैठक घेऊन लेखी स्वरुपात या गोष्टी आणल्या आहेत. ९ वर्षाआधी मी सह्याद्री गेस्ट हाऊसला गेलो होतो. त्याचवेळी २०२६ ला टोलचे करार संपतायेत असं समजलं होते. तेव्हा पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते. २०२६ पर्यत काही करता येत नाही. ९ वर्षांनी हा विषय पुन्हा ऐरणीवर आला. मुंबईतील ५ एन्ट्री पाँईटवर टोलदर वाढले. त्यामुळे हा विषय पुढे आला. अविनाश जाधव उपोषणाला बसला होता. नेमके त्याचवेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील टोलनाक्यावर चारचाकींना टोल नाहीत असं विधान आले. त्यामुळे लोकांमध्ये संभ्रमावस्था तयार झाली. सरकार टोल वसूल करत नाही मग हे पैसे जातात कुठे? असा प्रश्न निर्माण झाला होता असं त्यांनी म्हटलं.
त्याचसोबत स्वच्छ प्रशासनगृह, प्रथोमाचार, रुग्णवाहिका, तक्रार वही, अपघातासाठी लागणारी वाहने, टोलनाक्यांवरील सीसीटीव्ही यंत्रणेचे मॉनेटरिंग मंत्रालयात लागेल. टोलनाक्यावर होणाऱ्या त्रासाबद्दल लोकांना नंबर दिला जाईल. करारात नमुद उड्डाणपूलांचे आयआयटीच्या तज्ज्ञांकडून सर्व्हेक्षण करण्यात येईल. प्रत्येक टोलनाक्यावर जी पिवळी लाईन आहे त्यापलीकडे वाहने रांगा दिसल्या तर सर्व गाड्या विनाटोल सोडल्या जातील. ४ मिनिटांच्या वर टोलनाक्यावर वाहने उभी राहता कामा नयेत. पोलिसांची यंत्रणा लोकांच्या सुरक्षेसाठी तैनात असेल. फास्टटॅग यंत्रणा एकदाच वापरली जाईल. टोल किती वसूल होतोय, किती तारखेपर्यंत किती जमा झालेत हे मोठ्या डिजिटल स्क्रीनवर दाखवले जाईल. असंही राज यांनी सांगितले.
दरम्यान, आनंद नगर आणि ऐरोली प्रवास करणाऱ्या ठाणेकरांच्या वाहनांना एकदाच टोल भरावा लागेल. मुलुंडच्या हरिओम नगरमधील रहिवाशांसाठी तात्काल नाल्यावर पूल बांधला जाईल. सार्वजनिक बांधकाम विभागाचे २९ आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे १५ टोलनाके बंद करण्याबाबत सरकारकडून १ महिन्यात निर्णय घेतला जाईल. टोलप्लाझा परिसरात राहणाऱ्या लोकांना सवलतीत मासिक पास उपलब्ध केले जातील अशी माहिती राज ठाकरे यांनी पत्रकारांना दिली. टोलबाबत राज ठाकरे यांनी गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. रस्ते खराब असताना टोल कशाला अशी भूमिका राज ठाकरेंनी घेत टोलदरवाढीला विरोध केला होता. मुख्यमंत्र्यांसोबतच्या भेटीनंतर आज राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी मंत्री दादा भुसे यांच्यासह शासकीय अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीतून टोलविषयी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.