पुढील 2 दिवस मुंबईत अतिवृष्टी; हवामान खात्याने दिला सतर्कतेचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2019 10:43 AM2019-08-02T10:43:35+5:302019-08-02T10:44:07+5:30
गेल्या २४ तासांत राज्यातील अनेक ठिकाणी पावसाचा जोर वाढला आहे. कोल्हापूर, नाशिक या परिसरात अनेक नद्यांना पूर आला आहे.
मुंबई - जुलै महिन्यातील पाऊस संपून ऑगस्ट महिन्यातील पावसाला सुरुवात झाली आहे. समुद्रामध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या हवेमुळे शनिवारी आणि रविवारी मुंबईसह किनारपट्टीवर मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे.
मान्सून मिशन मॉडेलच्या अंदाजानुसार पावसाळाच्या दुसऱ्या टप्प्यात ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये देशात ९९ टक्के पावसाची शक्यता आहे़ मॉडेल एरर ८ टक्के दर्शविण्यात आली आहे. त्यामुळे दोन महिन्यांत पाऊसमान हे सर्वसाधारण (९४ ते १०६ टक्के) राहण्याची शक्यता ४५ टक्के इतकी आहे़ देशात ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये सरासरीच्या ४९ टक्के पाऊस पडतो़ यापूर्वी हवामान विभागाने जून ते सप्टेंबर दरम्यान ९६ टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज दिला होता. सध्या प्रशांत महासागरातील ‘एल निनो’ तटस्थ दिसत आहे़ मान्सून मिशन प्रोजक्टनुसार ही परिस्थिती संपूर्ण मान्सून काळात कायम राहणार आहे़ त्याचबरोबर भारतीय महासागरात अनुकुल स्थिती राहील, त्यामुळे देशात इथूनपुढचे दोन महिनेही चांगला पाऊस पडेल, असा अंदाज आहे.
Indian Meteorological Department: With the development of low pressure area over Bay, this Saturday night and Sunday, Mumbai is very likely to get intense heavy rainfalls.
— ANI (@ANI) August 2, 2019
Warnings are issued including for west coast. pic.twitter.com/2OtpAsu0Tv
गेल्या २४ तासांत राज्यातील अनेक ठिकाणी पावसाचा जोर वाढला आहे. कोल्हापूर, नाशिक या परिसरात अनेक नद्यांना पूर आला आहे. धरणं ओव्हर फ्लो झाल्याने पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. सांगलीतील श्रीश्रेत्र नृरसिंहवाडी मंदीर पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे. विदर्भात मध्यम पावसाची नोंद झाली आहे. त्याचप्रमाणे मराठवाड्याच्या काही भागात पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. मुंबईत जुलै महिन्यात १ हजार ४६४ मिलीमीटर पाऊस पडला असून, १९५९ सालानंतर २०१४ सालच्या जुलै महिन्यात मुंबईत १ हजार ४६८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर पडलेला हा सर्वाधिक मोठा दुसरा पाऊस आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली आहे. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळला आहे. तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची नोंद झाली आहे. गोव्यासह संपूर्ण राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे.