मुंबईकरांसाठी पुढचे ३६ तास महत्वाचे, २०० मिमी पाऊस कोसळणार; अंधेरी सबवे बंद; पश्चिम उपनगरात जोरदार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2024 12:49 PM2024-07-13T12:49:31+5:302024-07-13T12:50:35+5:30
Mumbai Rain Updates: मुंबईत आज सकाळपासून पावसाची संततधार सुरू असून पुढील ३६ तास मुंबईसाठी महत्वाचे आहेत.
Mumbai Rain Updates: मुंबईत आज सकाळपासून पावसाची संततधार सुरू असून पुढील ३६ तास मुंबईसाठी महत्वाचे आहेत. कारण या कालावधीत २०० मिमी पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. आज दिवसभर मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सध्या मुंबईच्या पश्चिम उपनगरांत मुसळधार पाऊस सुरू आहे.
अंधेरी सबवेमध्ये ३ ते ४ फूट पाणी भरल्यानं वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. वाहतुकीसाठी गोखले पुलाचा वापर करण्याचं आवाहन पालिकेकडून करण्यात आलं आहे. तसंच आज दिवसभर मुंबईत जोरदार पावसाचा अंदाज असल्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन देखील करण्यात आलं आहे. अंधेरी चकाला भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. काही दुकानांमध्ये पाणी शिरलं आहे. याचा परिणाम रस्ते वाहतुकीवर होत आहे. गोरेगाव, जोगेश्वरी, अंधेरी, विलेपार्ले भागात पावसाची रिपरिप सुरू असल्यामुळे धीम्या गतीनं वाहतूक सुरू आहे.
हवामान खात्याने मुंबईत आज जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज (ऑरेंज अलर्ट) वर्तवला आहे.
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) July 13, 2024
तसेच, सायंकाळी ४.३९ वाजता समुद्रात ३.६९ मीटर उंच भरती देखील आहे.
सबब, नागरिकांनी अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, ही विनंती.
आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ मदतीसाठी १९१६ या क्रमांकावर संपर्क…
लोकल सेवा सध्या सुरळीत
मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यात सकाळपासून पाऊस सुरू असला तरी सध्या लोकल वाहतुकीवर याचा कोणताही परिणाम झालेला नाही. तिन्ही मार्गावरील वाहतूक सध्या सुरळीत सुरू आहे. पण पावसाचा जोर कायम राहिल्यास लोकल सेवेवर परिणाम होऊ शकतो. दुपारी ४ वाजताच्या सुमारास मुंबईच्या समुद्रात भरती असणार आहे. याच कालावधीत पावसाचा जोर कायम राहिल्यास सखल भागांमध्ये पाणी साचू शकतं.
या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
शनिवार : मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
रविवार : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
सोमवार : रायगड, पुणे, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट