मुंबईत पुन्हा पावसाने पकडला जोर, सखल भागात पाणी साचण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 11:06 AM2017-09-20T11:06:50+5:302017-09-20T15:10:27+5:30
रात्रभर कोसळत असलेला पाऊस सकाळी 8.30 वाजल्यापासून थंडावला होता. त्यामुळे मुंबईकरांनी सुटकेचा निश्वास सोडला होता.
मुंबई, दि. 20 - रात्रभर कोसळत असलेला पाऊस सकाळी 8.30 वाजल्यापासून थंडावला होता. त्यामुळे मुंबईकरांनी सुटकेचा निश्वास सोडला. पण दुपारी एक वाजल्यापासून पुन्हा पावसाने जोर पकडला आहे. त्यामुळे सखल भागात पुन्हा एकदा पाणी साचण्याची शक्यता आहे. मुंबईत काल मंगळवार दुपारपासून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत.
मुंबईतील कालची स्थिती आणि आज सकाळपासून एकूणच वातावरणाचा नूर पाहता मुंबईकरांनी घरी राहणेच पसंत केले. त्यामुळे इतर दिवसांच्या तुलनेत मुंबईच्या रस्त्यावर फारशी गर्दी दिसत नाहीय. पुढच्या 48 तासात मुंबईत मुसळधार पाऊस कोसळणार नाही असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. याआधी हवामान विभागाने मुंबईत 48 तासात मुसळधार पाऊस कोसळेल असा अंदाज वर्तवला होता. हवामान विभागाने दिलेला इशारा मागे घेतला आहे.
मुंबईत मुसळधार पाऊस कोसळणार नाही पण अधनमधन पावसाच्या सरी कोसळत राहतील असे भारतीय हवामान विभागाचे वैज्ञानिक अजय कुमार यांनी सांगितले. आता पाऊस कमी होईल व परिस्थिती सुधारणा होईल असे त्यांनी सांगितले.
मुंबईत सकाळपासून पावसाचा जोर ओसरला आहे. आतापर्यंत मुंबई शहरात 210 मिमी पावसाची नोंद झाली आहे तर, उपनगरात 303 मिमी पाऊस झाला आहे. डहाणूमध्ये 304 मिमी पाऊस कोसळला आहे. मुंबईतील 24 तासांतील पावसाच्या तुलनेत नवी मुंबईत 19 सप्टेंबर रोजी सकाळी 8:30 ते रात्री 11:30 दरम्यान अधिक पाऊस झाला. पहाटे 5.30 पर्यंत कुलाबा वेधशाळेत 191 मिमी, सांताक्रूझमध्ये 275 मिमी पावसाची नोंद झाली होती.
दुपारी 12 च्या सुमारास समुद्राला भरती येणार असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे. त्याचवेळी पावसाचा जोर वाढला तर, मुंबईत वेगवेगळया भागात पाणी साचू शकते. काल दुपारपासून सुरु झालेल्या पावसाची संततधार सकाळपर्यंत कायम होती. मुंबईतील वाहतूक व्यवस्था अद्यापपर्यंत तरी सुरळीत आहे. मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकलसेवा काही मिनिट उशिराने सुरु आहे पण कुठेही ठप्प झालेली नाही.
Now rainfall will decrease, but light to moderate rainfall to continue in Mumbai region: Ajay Kumar, Scientist IMD Mumbai #MumbaiRainspic.twitter.com/l3tIaq2p8c
— ANI (@ANI) September 20, 2017
We have removed warning (for heavy rainfall), intermittent rainfall likely over city & suburbs for next 48 hrs: Ajay Kumar, Scientist IMD pic.twitter.com/FrZaRJbp9i
— ANI (@ANI) September 20, 2017