मुंबई : सरकार बदलले तसे एसटीचे स्वरूपही बदलले. त्यामुळे आगामी निवडणुकीत सरकार आपलेच असेल, आणि मंत्री, मुख्यमंत्रीही! मला काय बोलायचे आहे, हे तुम्हाला समजलेच असेल, असे सूचक उद्गार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काढले. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात इलेक्ट्रिसिटीवर चालणाऱ्या पहिल्या बसचे लोकार्पण, मुंबई सेंट्रल बस स्थानकाच्या ४९ मजली इमारतीचे आणि कुर्ला, विद्याविहार येथे एसटी कामगारांसाठी निवासस्थानांचे भूमिपूजन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, परिवहन मंत्री दिवाकर रावते, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रणजीत देओल यांच्या हस्ते गुरुवारी मुंबई सेंट्रल येथील आगारात झाले.
दरम्यान, युतीच्या जागा वाटपाची चर्चा सुरू असली तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एका व्यासपीठावर येण्याचे टाळले. गुरूवारी, रिपाइंचा मेळावा आणि एसटी महामंडळाच्या अत्याधुनिक मध्यवर्ती कार्यालयाच्या भूमीपूजनासाठी मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे दोघेही उपस्थित राहणार होते. मात्र, एसटीच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री गैरहजर राहिले तर रिपाइंच्या कार्यक्रमाकडे ठाकरे फिरकले नाहीत. राज्यपालांच्या शपथविधीसाठी उपस्थितर राहावे लागणार असल्याने मुख्यमंत्री येऊ शकले नसल्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी कार्यक्रमात सांगितले. मात्र, राज्यपालांच्या शपथविधीसाठी स्वत: रावतेसुद्धा उपस्थित होते. तिकडे, रिपाइंच्या मेळाव्याला मात्र मुख्यमंत्री फडणवीस यांनी आवर्जून उपस्थिती लावली.रिपाइंच्या या मेळाव्याला संबोधित करताना रामदास आठवले यांनी शिवसेना भाजपने एकत्र यावे असे आवाहन केले. फडणवीस आणि उद्धव ठाकरे याना एकत्र आल्याचे पाहायचे आहे. ते एकत्र आल्यास २३५- २४० जागा येतील. त्यात रिपाइंच्या ४-५ जागा येतील असेही ते म्हणाले.भाजप-शिवसेना युती ही तर अडथळ्यांची शर्यत!भाजप-शिवसेना युतीचा फॉर्म्यूला ठरविण्यासाठी बैठकी सुरू झालेल्या असल्या तरी अनेक मतदारसंघांमध्ये दोन्ही पक्ष दावेदारी करीत असल्याने युतीमध्ये तणावाची स्थिती आहे. राज्यात किमान ५० विधानसभा मतदारसंघांत रस्सीखेच आहे.