दुसऱ्या दिवशी ‘जैसे थे’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:08 AM2021-03-04T04:08:33+5:302021-03-04T04:08:33+5:30
लसीकरणाचा दुसरा टप्पा; लस घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांची केंद्रांवर गर्दी लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : शहरातील जम्बो कोरोना केंद्रासह पालिका, ...
लसीकरणाचा दुसरा टप्पा; लस घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांची केंद्रांवर गर्दी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : शहरातील जम्बो कोरोना केंद्रासह पालिका, खासगी रुग्णालयांमध्ये दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण सोमवारी सुरू झाले. मात्र, लसीकरणाच्या दुसऱ्या दिवशीही मंगळवारी शहर, उपनगरातील वांद्रे, नेस्को जम्बो कोरोना केंद्रांवर कोरोनाविषयक नियमांना अंतर देण्यात आले. ज्येष्ठ नागरिकांनी लस घेण्यासाठी केंद्रावर गर्दी केल्याचे दिसून आले, शिवाय माहितीची अभाव असल्याने दुसऱ्या दिवशीही लसीकरण केंद्रावर गोंधळाची स्थिती होती.
वृद्धांसह ४५ ते ५९ वयोगटातील गंभीर आजारांच्या रुग्णांना लसीकरण करण्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी शहरात प्रचंड गोंधळ उडाला. खासगी केंद्रात लसीकरण प्रक्रियेला आणखी विलंब होत असल्याचे दिसून आले. या ठिकाणी रुग्णालय व्यवस्थापनांनी खासगी अर्जही भरण्यास बंधनकारक केल्याने ज्येष्ठ नागरिकांना आणखी ताटकळत बसावे लागत असल्याचे चित्र हाेते. शासकीय केंद्रावर कुठे कोविन अॅपमधील तांत्रिक दोष, तर कुठे इतर कारणांमुळे तासन्तास वृद्ध ताटकळत राहिले. गर्दीमुळे सर्वत्र सुरक्षित अंतराच्या नियमाचा भंग झाला. गर्दी बघून अनेकांनी परतीचा मार्ग धरला.
सोमवारी सकाळी ९ वाजल्यापासून अनेकांनी कोविन अॅप, आरोग्य सेतू अॅपवर नोंदणीचा प्रयत्न केला; परंतु कोविन अॅपचा सर्व्हर डाऊन, तर आरोग्य सेतूमध्ये नोंदणीदरम्यान तांत्रिक दोष दाखवून नोंदणी होत नव्हती. केंद्रांवर वृद्ध गटातील व्यक्तींनी लसीकरणासाठी गर्दी केली होती. येथे गर्दीच्या तुलनेत सुविधा नव्हत्या. केंद्रातही लसीकरणाच्या नोंदी होत नसल्याने अधिकारी गोंधळातच होते. सुमारे तासभराने काही ठिकाणी नोंदणी सुरू झाली. त्यामुळे लसीकरणही सुरू झाले.
वांद्रे येथील केंद्राचा व्हिडिओ व्हायरल
हा लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू असून मंगळवारी बीकेसी येथील लसीकरण केंद्रात गोंधळ पाहावयास मिळाला. सकाळच्या वेळेस येथे लाभार्थींची प्रचंड गर्दी जमली होती. यावेळी सोशल डिस्टन्सिंग नसल्याने गोंधळ उडाल्याचा व्हिडिओ वायरल करण्यात आला. या व्हिडिओत सोशल डिस्टन्सिंग अजिबात पाळले जात नसल्याचे स्पष्ट दिसत होते. अखेर यावर बीकेसी अधिष्ठाता डॉ. राजेश डेरे यांनी भाष्य केले. लसीकरणात अजिबात गोंधळ नसून सुरुवातीच्या तासात थोडासा गोंधळ झाला होता. मात्र, लगेचच कोविन ॲपमधील गोंधळ दूर करण्यात आला. तसेच इतर उणीवही दूर केल्या. केंद्रात लसीकरण सकाळी ११.२० वाजता नियमित करण्यात आले. सर्व स्थिती नियंत्रणात असल्याचे डॉ. डेरे सांगितले.