मुंबईकरांसाठी पुढचे आठ दिवस धोक्याचे; गणेशोत्सवात भेटीगाठी वाढल्याने कोरोनाचा प्रसार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2020 02:47 AM2020-09-06T02:47:44+5:302020-09-06T06:58:26+5:30
मुंबई : गणेशोत्सव काळात लॉकडाऊन शिथिल केल्याने सार्वजनिक ठिकाणी नागरिकांची गर्दी वाढली. उत्सवादरम्यान भेटीगाठी वाढल्याने कोरोनाचा प्रसार वाढला. परिणामी, ...
मुंबई : गणेशोत्सव काळात लॉकडाऊन शिथिल केल्याने सार्वजनिक ठिकाणी नागरिकांची गर्दी वाढली. उत्सवादरम्यान भेटीगाठी वाढल्याने कोरोनाचा प्रसार वाढला. परिणामी, गेले दोन दिवस रुग्णसंख्या १९०० वर पोहोचली असून पुढील आठ दिवस हीच वाढ दिसून येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिका यंत्रणा आणखी सतर्क करण्यात आली आहे.
पालिकेच्या उपाययोजनांमुळे मुंबईतील रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी ९३ दिवसांवर होता. दैनंदिन रुग्णवाढही ०.७५ टक्क्यांवर होती. मात्र गेल्या दोन आठवड्यांत सक्रिय रुग्णसंख्या २० टक्क्यांनी वाढली. रुग्णवाढीचा दैनंदिन दरही ०.९० टक्क्यांवर आहे, तर दुपटीचा कालावधी ७७ दिवस झाला आहे.
लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर नागरिकांनी खबरदारी न घेतल्याने धोका वाढला. त्यामुळे रोज होणाऱ्या सहा हजार कोरोना चाचण्या दहा हजारांपर्यंत वाढविल्या असून पालिका रुग्णालयात सर्व व्यवस्था करण्यात आली आहे.
यंत्रणा सज्ज
लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर रुग्णसंख्येमध्ये वाढ होईल, असा अंदाज होता. आवश्यक खबरदारी घेतली जात आहे. गणेशोत्सवानंतर पुढील दहा दिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.
- सुरेश काकाणी (अतिरिक्त पालिका आयुक्त)
ऑगस्ट महिन्यातील रुग्ण
२३ ऑगस्ट - ९३१, २४ - ७४३, २५ - ५८७, २७ - १३५०, २८-१२१७, २९ - १४३२, ३० - १२३७,
३१ - ११७९ , २ सप्टेंबर - १६२२,
३ सप्टेंबर-१५२६, ४ सप्टेंबर-१९२०