Join us

आयआयटी बॉम्बेचे पुढील संपूर्ण सत्र ऑनलाईन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2020 6:15 PM

संपूर्ण सत्र ऑनलाईन घेण्याचा निर्णय घेणारी आयआयटी ठरली देशातील पहिली संस्था; ऑनलाइनची सुविधा सर्व विद्यार्थ्यांना पोहचविण्यासाठी ५ कोटींचा निधी उभारण्याची ही तयारी

मुंबई : मुंबई आणि राज्यातील कोरोनाची परिस्थिती व प्रादुर्भाव पाहता पुढील शैक्षणिक सत्र सुरु करण्यास आणखी उशीर न करता ते लवकरच सुरु करण्याचा आणि ते पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने चालविण्याचा निर्णय आयआयटी बॉम्बे प्रशासनाने घेतला आहे. आयआयटी बॉम्बेच्या विद्यार्थ्यांचे पुढील सत्रात कोणतेही फेस टू फेस म्हणजे , ऑफलाईन किंवा क्लासरूम पद्धतीचे वर्ग होणार नसल्याची माहिती संस्थेचे संचालक प्राध्यापक शुभाशीष चौधरी यांनी दिली आहे. असा निर्णय घेणारी आयआयटी बॉम्बे ही देशातील पहिलीच संस्था असून सिनेट सदस्य आणि प्राध्यापकांसोबत दीर्घ चर्चा यानंतर प्रशासनाने हा निर्णय घेतला असल्याची माहिती त्यांनी दिली. आयआयटी बॉम्बेचे विद्यार्थी आणि त्यांचे आरोग्य ही संस्थेची प्राथमिकता असून त्या दृष्टीने हा निर्णय घेतला गेल्याची माहिती चौधरी यांनी दिली.आयआयटी बॉम्बे ही देशातील नामांकित आणि मानांकनप्राप्त संस्था आहे. निश्चितच संस्थेच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान संस्थेला परवडण्यासारखे नाही. मात्र मुंबईतील कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे सध्यस्थितीत विद्यार्थ्यांना त्यांच्या मूळ गावाहून बोलावणे आणि त्यांच्या शिकविण्या घेणे त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने घातक ठरू शकते. या पार्श्वभूमीवर आयआयटी सिनेट प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. पुढील सत्राच्या ऑनलाईन शिवणीचे वर्ग  कधी आणि कसे सुरू होतील ? यबाबत विद्यार्थ्यांना लवकरच कळवले जाणार असल्याची माहिती सुभाशीष चौधरी यांनी दिली.आयआयटी बॉम्बे मधील अनेक विद्यार्थ्यांच्या आर्थिक परिस्थितीचाही संस्थेने विचार केला आहे. पुढील सत्र ऑनलाईन पद्धतीने चालविण्यासाठी विद्यार्थ्यांना इंटरनेट , लॅपटॉपसारख्या वस्तूंची गरज भासणार आहे. मात्र प्रत्येक विद्यार्थ्याजवळ त्याची सोय असेलच असे नाही. हंस परिस्थितीत कोणताही विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापासून नये यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती संचालक चौधरी यांनी दिली. प्रत्येक विद्यार्थ्याला या सुविधा मिळण्यासाठी प्रयत्न केला असता संस्थेकडून तब्ब्ल ५ कोटी रुपयांची उभारणी करण्याची गरज त्यांनी स्पष्ट केली. आयआयटी बॉम्बेच्या ऍल्युमनी कौन्सिलकडून चांगला निधी या कारणासाठी मिळणार असला तरी तो पुरेसा ठरणार नाही. केवळ पैशांअभावी या हुशार विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीत अडथळा येऊ नये यासाठी  आयआयटी संचालकांनी इतर विद्यार्थी, सेवाभावी संस्था आणि समाजाला निधीसाठी मदत करण्याचे आवाहन केले आहे. तुमची छोटीशी मदत देशाचे भविष्य घडविण्यासाठी मदत करू शकणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

 

टॅग्स :आयआयटी मुंबईशिक्षणशिक्षण क्षेत्रकोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस