‘के-ईस्ट’मध्ये गावठाण पुनर्विकासाला बगल
By Admin | Published: February 15, 2017 05:05 AM2017-02-15T05:05:12+5:302017-02-15T05:05:12+5:30
मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांकडून विविध समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले जात असतानाच
मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांकडून विविध समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले जात असतानाच गावठाणांच्या मुद्द्याला मात्र बगल देण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे मुंबई महापालिकेनेही आपल्या अजेंड्यात गावठाणांच्या पुनर्विकासाला बगल दिली असून, त्यामुळे गावठाणात वास्तव्य करणाऱ्या रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.
मुंबई महापालिकेच्या ‘के-ईस्ट’ वॉर्डने मंगळवारी येथील गावठाणांच्या रहिवाशांना गावठाणांवर चर्चा करण्यासाठी सकाळच्या बैठकीची वेळ दिली. त्यानुसार, मरोळ, गुंदवली, सहार, सुतार पाखडी, टंक पाखडी, चर्च पाखडी, चकाला, बामणवाडा, बामणपुरी आणि विलेपार्ले येथील रहिवासी गावठाणांच्या पुनर्विकासावर चर्चा करण्यासाठी दाखलही झाले. मात्र बैठकीत गावठाणांच्या मुद्द्यांऐवजी ‘क्लस्टर डेव्हल्पमेंट’वर चर्चा करण्यात आली. याअंतर्गत पेव्हर ब्लॉक, पाणीपुरवठा, दिवे आणि कचरा या विषयांवर मोघम चर्चा करण्यात आली. परिणामी, बैठकीला आलेल्या रहिवाशांचा हिरमोड झाला, अशी माहिती वॉचडॉग फाउंडेशनचे ट्रस्टी गॉडफ्रे पिमेंटा यांनी दिली. गावठाणांचा पुनर्विकास म्हणजे आम्हाला ‘क्लस्टर डेव्हलपमेंट’ अपेक्षित नाही; तर गावठाणांचा पुनर्विकासच अपेक्षित आहे, असे आम्ही पुन्हा नमूद करू इच्छितो, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)