लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : ज्येष्ठ नेते ॲड. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी दोषनिश्चिती सुनावणीवेळी सर्व संशयित आरोपी उपस्थित नसल्याने सुनावणी पुढे ढकलण्यात आली. पुढील सुनावणी ५ ऑगस्ट रोजी होत आहे. त्यावेळी सर्व १० संशयित उपस्थित ठेवण्याचे आदेश न्यायाधीशांनी एसआयटीला दिले. बुधवारी न्यायालयात संशयित वीरेंद्र तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर व समीर गायकवाड हे उपस्थित होते.
कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयात जिल्हा न्यायाधीश (वर्ग ३) एस. एस. तांबे यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील शिवाजीराव राणे उपस्थित होते. सुनावणी वेळी डॉक्टर वीरेंद्र तावडे, शरद कळसकर, सचिन अंदुरे व समीर गायकवाड या चार संशयितांना पुणे येथील येरवडा कारागृहातून पोलीस बंदोबस्तात आणून कोल्हापूर न्यायालयात हजर केले. याशिवाय अमोल काळे, वासुदेव सूर्यवंशी, भारत कुरणे, अमित डेगवेकर, अमित बद्दी, गणेश मिस्कीन हे सहा संशयित बंगलोर येथील कारागृहात आहेत. त्यांना तांत्रिक अडचणीमुळे सुनावणीवेळी उपस्थित राहता आले नाही.
‘कॉन्फरन्सद्वारे सुनावणी घेऊ नये’दोषनिश्चिती सुनावणी वेळी सर्व संशयित न्यायालयात उपस्थित असावेत, व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे त्यांची सुनावणी घेऊ नये, अशी विनंती आरोपींचे वकील ॲड. समीर पटवर्धन यांनी न्यायालयाकडे केली. त्यानुसार पुढील सुनावणी ५ ऑगस्ट रोजी होत आहे.