काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांचे आवाहन
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : काँग्रेस स्थापना दिनाचे औचित्य साधत नवनियुक्त मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप आणि कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा यांनी पक्षातील दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत पदभार स्वीकारला. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात झालेल्या या सोहळ्यात काँग्रेस नेत्यांनी स्वबळाची भाषा करत मुंबईचा आगामी महापौर काँग्रेसचाच असला पाहिजे, त्यासाठी कार्यकर्त्यांनी आतापासून तयारीला लागावे, असे आवाहन केले.
प्रदेश प्रभारी एच.के. पाटील, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यासह मुंबईचे मावळते अध्यक्ष एकनाथ गायकवाड, आजी-माजी मंत्री, आमदार, खासदार उपस्थित होते. जे पक्ष किंवा व्यक्ती संयुक्त पुरोगामी आघाडीत (संपुआ) नाहीत त्यांनी अध्यक्षपदाबाबत वक्तव्य करून अफवा किंवा संभ्रम निर्माण करू नये. आमच्या नेत्यांबद्दल काहीही बोललेले आम्ही सहन करणार नाही, अशा शब्दात एच.के. पाटील यांनी शिवसेनेला एकप्रकारे इशारा दिला. तसेच, काँग्रेस कार्यकर्त्यांचा आजचा जोश आणि ऊर्जा बघता आगामी महानगरपालिका निवडणुकीत पक्षाला भरघोस यश मिळणार हे नक्की आहे. सर्व २२७ जागा लढवायच्या की नाही ते चर्चा करून ठरवू. पण, काँग्रेसचा महापौर किंवा आपल्याशिवाय सत्ता नाही, अशी स्थिती आणण्यासाठी आत्तापासूनच कामाला लागा, असे आवाहनही एच.के. पाटील यांनी यावेळी केले.
तर, भाई जगताप यांनी, आगामी पालिका निवडणुकीत सर्व २२७ जागांवर पक्षाने निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. पक्षनेतृत्वाने तसे आदेश दिल्यास आमची तयारी आहे. तसेच विरोधकांसाठी जिथे आवश्यक आहे तिथे एक घाव दोन तुकडे मी करणार, जोरदार झटका देणार. भाजपने सध्या पालिकेत असलेल्या आपल्या ८२ जागा टिकवून दाखवाव्यात, असे आव्हान दिले. काँग्रेसच्या बारा मंत्र्यांनी महिन्यातून एक दिवस जनता दरबारासाठी द्यावा. जनतेची कामे केली तर चांगले यश नक्की मिळणार, असे सांगतानाच मागील काळात पक्ष सोडून गेलेल्यांना परत पक्षात घेण्यासाठी घरवापसीची परवानगी द्या. सगळ्यांना पुन्हा काँग्रेसमध्ये आणणार असल्याचे भाई जगताप म्हणाले.
तर, नवनियुक्त कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा यांनीही महापालिकेत काँग्रेसचा तिरंगा फडकाविणार असल्याचे सांगितले. तसेच काँग्रेस नेत्यांविषयी जर कोणी काही बोलत असेल तर ते आम्ही कदापि सहन करणार नाही. सरकार ही प्राथमिकता नाही तर काँग्रेस पक्ष आणि त्याचे नेतृत्व आमच्यासाठी महत्त्वाचे असल्याचे स्पष्ट केले.
यावेळी बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, माणिकराव ठाकरे, अस्लम शेख, वर्षा गायकवाड, एकनाथ गायकवाड, प्रचार समिती अध्यक्ष नसीम खान, जाहीरनामा व प्रकाशन समितीचे अध्यक्ष सुरेश शेट्टी, मुंबईचे प्रभारी चंद्रकांत हंडोरे आणि समन्वय समिती अध्यक्ष अमरजीतसिंग मनहास यांची भाषणे झाली.
...........................