Join us  

आमच्या पुढील सभा मराठवाड्यात; संजय राऊतांनी सांगितलं ठिकाण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2023 12:27 PM

महाराष्ट्र दिनी ०१ मे रोजी महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा मुंबईत पार पडली. ही महाविकास आघाडीची तिसरी वज्रमूठ सभा होती

मुंबई - राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल संमिश्र लागला असून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही शिंदे सरकारला कुठलाही धोका नाही. शिंदे सरकारचं कामकाज सुरळीत सुरू असून आता महाविकास आघाडीत बिघाडी होईल, असे सत्ताधाऱ्यांना वाटत आहे. मात्र, कर्नाटकमधील भाजपाच्या पराभवानंतर महाविकास आघाडीचे सर्वच नेते आनंदी झाले असून भाजप विरुद्ध अधिक ताकदीने लढण्याची भाषा करत आहेत. त्यात, शिवसेना खासदार संजय राऊत हेही आक्रमक दिसून येतात. सध्या, ते मराठवाडा दौऱ्यावर आहेत. येथे त्यांच्या सभा होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. 

महाराष्ट्र दिनी ०१ मे रोजी महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा मुंबईत पार पडली. ही महाविकास आघाडीची तिसरी वज्रमूठ सभा होती. यापूर्वी छत्रपती संभाजीनगर, नागपूर येथे वज्रमूठ सभेचे आयोजन करण्यात आले होते. यापुढेही राज्यभरात वज्रमूठ सभांचे आयोजन केले जाणार होते. मात्र, महाविकास आघाडीच्या पुढील तीन वज्रमूठ सभा रद्द करण्यात आल्या. शरद पवार यांनी अध्यक्षपदावरून पायउतार होत निवृत्तीची घोषणा केल्यानंतर यासंदर्भात निर्णय झाला. मात्र, या सभा रद्द करण्याचं मूळ कारण हे उन्हाचा वाढता पारा आणि लोकांची गैरसोय नको हेच असल्याचं महाविकास आघाडीने सांगितलं होतं. मात्र, शिवसेनेच्या स्वतंत्र सभा होत आहेत. काही दिवसांपूर्वी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाड येथे सभा झाली होती. आता, शिवसेनेचा मराठावाडा दौरा सुरू आहे. 

रावसाहेब दानवे यांनी पुन्हा लोकसभेला निवडून येऊन दाखवावे, महाविकास आघाडी त्याचा पराभव करेन, असे संजय राऊत यांनी म्हटले. तर, सध्या आमचा मराठवाडा दौरा आहे, त्यासाठी आम्ही फिरत आहोत. आमची बीड, नांदेड ला सभा आहे. आम्ही सगळे नेते महाराष्ट्रभर फिरत आहोत. सगळे नेते बीडच्या सभेला जमणार आहेत, असे संजय राऊत यांनी सांगितले. त्यामुळे, आता २० तारखेला बीडमध्ये कोणकोणते नेते सभेसाठी येणार हे पाहावे लागेल. 

कर्नाटकात का हरलात - राऊत

जे पी नड्डा यांचा मुंबईशी काय संबंध? त्यांनी मुंबईत येऊन लुडबुड करू नये. मुंबई ताब्यात घेण्यासाठी आपण प्रयत्न करत आहात हे माहीत आहे. पण, देशातील भ्रष्टाचारावर आपण बोला, कर्नाटकात आपण का हरलात? त्याच्यावर बोला, असे म्हणत संजय राऊत यांनी जेपी नड्डा यांना फटकारलं. तसेच, वीर सावरकरांच्या संदर्भात ज्या भूमिका शिवसेनेने घेतलेल्या आहेत, त्या विज्ञानवादी आणि हिंदुत्ववादी आहेत. गोमुत्र धारीरी हिंदुत्व हे सावरकरांना माहित नाही, त्यावर जे पी. नड्डा यांनी बोलावं. जे गोमुत्रधारी आहेत, तेच दंगलखोर आहेत त्यांची पहिली चौकशी करा, अशी मागणीही राऊत यांनी केली आहे.  

टॅग्स :संजय राऊतभाजपाशिवसेना