Join us

'देवबाभळी'ची पुढील वाटचाल महाराष्ट्राबाहेर, ५०० प्रयोगांनंतर घेतला महाराष्ट्राचा निरोप

By संजय घावरे | Published: November 23, 2023 4:51 PM

संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांची पत्नी अवली आणि भगवान पांडुरंगाच्या पत्नी रखुमाई यांच्यावर आधारलेल्या 'संगीत देवबाभळी' या नाटकाचा ५०० वा प्रयोग कार्तिकी एकादशीच्या पूर्व संध्येला षण्मुखानंद चंद्रशेखरेंद्र सरस्वती सभागृहात सादर करण्यात आला.

मुंबई - देव आणि भक्त यांच्यातील विचारांचा अद्भुत संगम घडवत अवघ्या महाराष्ट्रातील रसिकांना मोहिनी घालणाऱ्या 'संगीत देवबाभळी' या नाटकाने ५०० प्रयोगांनंतर महाराष्ट्रातील नाट्यप्रेमींचा निरोप घेतला आहे. यानंतर 'देवबाभळी' या नाटकाची महाराष्ट्राबाहेर वाटचाल सुरू होणार असल्याचे मुख्य भूमिकेतील शुभांग सदावर्तेने जाहिर केले आहे.

संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांची पत्नी अवली आणि भगवान पांडुरंगाच्या पत्नी रखुमाई यांच्यावर आधारलेल्या 'संगीत देवबाभळी' या नाटकाचा ५०० वा प्रयोग कार्तिकी एकादशीच्या पूर्व संध्येला षण्मुखानंद चंद्रशेखरेंद्र सरस्वती सभागृहात सादर करण्यात आला. त्यापूर्वी या नाटकाने महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये प्रयोग करत कौतुकाची थाप मिळवली. निरोपाचा हा सोहळा कोणताही गाजावाजा न करता अत्यंत साध्या पद्धतीने करण्यात आला. या प्रयोगाला सोनाली कुलकर्णी, जितेंद्र जोशी, सिद्धार्थ जाधव, संदीप पाठक, महेश लिमये, लेखक महेश एलकुंचवार, ओम राऊत, अनिता दाते, भीमराव मुडे आदींनी हजेरी लावली.

२२ डिसेंबर २०१७ रोजी या व्यावसायिक नाटकाचा सुरू झालेला प्रवास सहा वर्षांनी थांबवताना मुख्य भूमिकेतील शुभांगी सदावर्ते, मानसी जोशी यांच्यासह लेखक-दिग्दर्शक प्राजक्त देशमुख, निर्माता प्रसाद कांबळी, संगीतकार आनंद ओक, प्रकाश योजनाकार प्रफुल्ल दीक्षित आदी सर्वांनाच भावना अनावर झाल्या आणि डोळ्यांच्का कडा ओलावल्या. आजचा हा सोहळा नसणे हाच सोहळा असल्याचे सांगत प्राजक्त म्हणाले की, महाराष्ट्रातील शेवटच्या प्रयोगाला सोहळ्याचे रूप न देता नेहमीप्रमाणेच नाटक सादर करण्याचा विचार केला. अवलीरूपी शुभांगीला सकाळी मेसेज पाठवला की, तू आज इंद्रायणीत उतरशील तेव्हा शेवटचे पाय सोडणार आहेस. आज तू तुकारामांना शेवटची हाक मारणार आहेस. लखुबाईच्या भूमिकेतील मानसीला आज गाठोडे बांधशील तेव्हा काहीच मागे राहणार नाही याची काळजी घ्यायला सांगितल्याचेही प्राजक्त म्हणाले. यावेळी प्राजक्त यांनी स्वरचित 'दोन सख्या होत्या माझ्या, रोज यायच्या नदीला. एक दुडकी-पोटुशी, एक ठेंगणी उंचीला...' हि कविता सादर केली. या नाटकाने जरी महाराष्ट्रातील नाट्यप्रेमींचा निरोप घेतला असला तरी याचे मंत्रमुग्ध करणारे संगीत जानेवारीमध्ये रसिकांपर्यंत पोहोचणार असल्याची माहिती कांबळी यांनी दिली.

शुभांगी म्हणाली की, २०१५ पासून एकांकिकेपासून व्यावसायिक नाटकापर्यंत माझ्यात ज्या अवलीने जन्म घेतला होता. ती महाराष्ट्रासाठी खूप मोठी झाली. आज त्या अवलीची महाराष्ट्रापासून नाळ तुटली असली तरी ती माझ्यात रुजली आहे. महाराष्ट्रासाठी इथेच थांबत असल्याचे दु:ख आहे, पण महाराष्ट्राबाहेर याचे प्रयोग होतीलच, ज्याची घोषणा लवकरच करण्यात येईल असेही शुभांगीने सांगितले.

प्रसाद म्हणाला की, सहा वर्षांपूर्वी प्राजक्तसोबत या नाटकाचा प्रवास सुरू करताना ५०० प्रयोगांपर्यंत पोहोचेल असे कधीच वाटले नव्हते. या कलाकृतीवर भरभरून प्रेम करणाऱ्या महाराष्ट्रातील तमाम रसिकांचे आभार... लहानपणी याच सभागृहात 'वस्त्रहरण'चा आठशे आणि हजारावा प्रयोग पाहिला. इथेच १४ वर्षांपूर्वी 'वस्त्रहरण'चा ५०००वा प्रयोग केला. आता १४ वर्षांनी याच ठिकाणी 'देवबाभळी'च्या निरोपाचा भव्य प्रयोग सादर केल्याचा आनंद असल्याचेही प्रसाद म्हणाला.

आनंद ओक म्हणाले की, या सर्व प्रवासात एकांकीकेपासूनच्या सर्व सहकाऱ्यांना असे कधीच वाटले नव्हते की आपल्यासाठी उभा महाराष्ट्र टाळ्या वाजवेल. 'देवबाभळी' नावाचा काटा आवलीला दु:ख देतो, पण या नाटकाचा काटा जन्मभर तुमच्या-आमच्या सर्वांच्या काळजात रुतत राहिल असेही ते म्हणाले.

टॅग्स :मुंबई