कोरोनामुळे पुढच्या हंगामात ‘मत्स्य-सुकाळ’
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2020 06:42 AM2020-04-15T06:42:07+5:302020-04-15T06:42:17+5:30
मासेमारीबंदीचा होणार फायदा : शेकडो प्रजातींचा मत्स्यसाठा वाढणार
हितेन नाईक
मुंबई : कोरोनाच्या संसर्गामुळे १३ राज्यांतील मासेमारी बंद असल्याने पापलेट, रावस आदी शेकडो प्रजातींचे अंडीधारक मासे सध्या समुद्रात कोट्यवधीच्या संख्येने अंडी टाकत असल्याने समुद्रातील घटलेली माशांची संख्या वाढण्यास मोठी मदत होणार आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यानंतर मत्स्य दुष्काळ घटेल. मच्छीमारांचा फायदा होईल आणि शासनास परकीय चलनही मिळेल, असे निरीक्षण सीएमएफआरआयचे माजी शास्त्रज्ञ डॉ. विनय देशमुख यांनी व्यक्त केले. केंद्र शासनाने सध्या १३ राज्यांत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेली मासेमारी ३१ मेपर्यंत ‘लॉकडाउन’ करणे सर्वांच्या हिताचे ठरेल, असेही त्यांनी सांगितले.
माशांसाठी सध्या समुद्राचा तळ घुसळून काढला जातो, ते पाहता २०२४ पर्यंत समुद्रात एकही मासा शिल्लक राहणार नाही, असा इशारा सीएमएफआरआय संस्थेतील शास्त्रज्ञांनी केंद्रासह सर्व राज्यांना दिला होता. मात्र त्याकडे सर्वांनीच दुर्लक्ष केल्याने मत्स्य उत्पादन वेगाने घसरले होते. आता कोरोनामुळे मत्स्यसाठ्यात वाढीची संधी मिळाली आहे.
मच्छीमारांना द्या पॅकेज, व्याजमाफी
कोरोनामुळे मत्स्यसाठे वाढविण्याची संधी निर्माण झाल्याने तिचे सोने करण्यासाठी ३१ मेपर्यंत सर्व १३ राज्यांत एकसमान मासेमारी बंदी घालावी, अशी मागणी परंपरागत पद्धतीने मासेमारी करणारे मच्छीमार व एनएफएफ या राष्ट्रीय मच्छीमार संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केली. १ जून ते ३१ जुलै अशी पावसाळी मासेमारी बंदी महाराष्ट्र, गुजरातसह अन्य काही राज्यांत असते. त्यामुळे मासेमारीचा हंगाम सुरू होण्याआधी माशांच्या वाढीसाठी यंदा ५ ते ६ महिन्यांचा पोषक कालावधी मिळेल. तत्पूर्वी केंद्र व राज्य शासनाने उदरनिर्वाहासाठी मच्छीमारांना पॅकेज व त्यांच्या कर्जावरील व्याजमाफी दिल्यास जिल्ह्यातील मच्छीमार ३१ मेपर्यंत मासेमारीबंदी पाळतील, असे ममकृसच्या महिला जिल्हाध्यक्षा ज्योती मेहेर यांनी व्यक्त केले.
माशांची लाखो टन पिल्ले समुद्रात फिरत आहेत. त्यांना वाचवल्यास पाच-सहा महिन्यांत चांगली वाढ होऊन मासेमारी व्यवसायाला बळकटी मिळेल.
- डॉ. विनय देशमुख, शास्त्रज्ञ