पुढील स्टेशन ‘परळ टर्मिनस’, फेब्रुवारी अखेरपर्यंत खुले होण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2019 06:31 AM2019-01-10T06:31:45+5:302019-01-10T06:32:21+5:30
काम अंतिम टप्प्यात : फेब्रुवारी अखेरपर्यंत खुले होण्याची शक्यता
कुलदीप घायवट
मुंबई : गर्दीचे विभाजन करण्यासाठी परळ स्थानकाचे रूपांतर ‘टर्मिनस’मध्ये करण्यात येत आहे. हे काम अंतिम टप्प्यात आले असून, फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस प्रवाशांना ‘पुढील स्टेशन परळ टर्मिनस’ असे ऐकायला मिळाल्यास नवल वाटायला नको!
परळ स्थानकावर तीन ठिकाणी स्वतंत्र रॅम्प, सरकता जिना, लिफ्ट, तीन प्लॅटफॉर्म आणि लष्काराकडून पादचारी पूल बनविण्यात आला आहे. सध्या परळ टर्मिनसचे ९५ टक्के काम पूर्ण झाले असून, फेब्रुवारीत ते प्रवाशांसाठी खुले केले जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे.
दिवसेंदिवस दादर स्थानकात वाढत जाणारी प्रवाशांची गर्दी आणि त्यामुळे लोकलवर पडणारा ताण, एलफिन्स्टन चेंगराचेंगरीची घटना, परळ स्थानकात गेल्या काही वर्षांत प्रवाशांची वाढलेली वर्दळ यामुळे रेल्वे प्रशासनाने परळ टर्मिनस उभारण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार या स्थानकातील सध्याच्या एक नंबर फलाटातून ठाणे, कल्याणच्या दिशेने लोकल सोडण्याचे नियोजन आहे. टर्मिनसमुळे दादरला थांबा घेणारी लोकल परळ स्थानकात थांबा घेऊन तेथून कल्याण, कसारा, कर्जत दिशेने रवाना होईल. त्यामुळे दादर स्थानकावरील भार कमी होईल.
या टर्मिनससाठी अंदाजे ९० कोटी रुपये खर्च झाला असल्याचे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. परळ ते दादर दरम्यान डाऊन धीम्या मार्गावर नवीन रूळ, ओव्हरहेड वायर यांसह अन्य तांत्रिक कामे करण्यात आली आहेत. सध्याच्या नवीन फलाटावर १५ डब्यांच्या लोकलही थांबू शकतील, अशा पद्धतीने रचना करण्यात आली आहे. परळ टर्मिनससाठी सध्याच्या एक नंबर फलाटातून ठाणे, कल्याणच्या दिशेने लोकल सोडण्याचे नियोजन आहे. याच कामासाठी सध्याचा एक नंबर फलाट बंद करण्यात आला आहे. हे काम मार्च २०१९ पर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाºयांनी दिली.
गर्दीचे होणार विभाजन
मध्य रेल्वेवरील दादर स्थानकावरील गर्दी विभागण्यासाठी परळ स्थानकांचे रुपांतर टर्मिनसमध्ये करण्याचा विचार मध्य रेल्वेने केला होता. त्यादृष्टीने काम सुरू असल्याचे मध्य रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी अनिलकुमार जैन यांनी सांगितले.