प्लॅस्टिकच्या विल्हेवाटीसाठी पालिकेचे ‘पुढचे पाऊल’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 01:38 AM2018-04-18T01:38:22+5:302018-04-18T01:38:22+5:30
प्लॅस्टिकच्या पिशव्यांबरोबरच, बाटल्यांची विल्हेवाट लावणेही डोकेदुखी ठरत आहे. दररोज अशा ३८ लाख बाटल्यांचा वापर मुंबईत होत असल्याने ५०० प्लॅस्टिक बॉटल क्रशिंग मशीन बसविण्याचा निर्णय महापालिक प्रशासनाने घेतला आहे.
मुंबई : प्लॅस्टिकच्या पिशव्यांबरोबरच, बाटल्यांची विल्हेवाट लावणेही डोकेदुखी ठरत आहे. दररोज अशा ३८ लाख बाटल्यांचा वापर मुंबईत होत असल्याने ५०० प्लॅस्टिक बॉटल क्रशिंग मशीन बसविण्याचा निर्णय महापालिक प्रशासनाने घेतला आहे. या मशीनची सुरुवात महापालिका मुख्यालयातूनच होणार आहे. ५०० मशीनपैकी पहिल्या दोन मशीन मुंबई महापालिका मुख्यालयात बसविण्यात आल्या आहेत.
पाण्याच्या बाटल्या मानवासाठी जितक्या सोयीस्कर आहेत, तेवढ्याच त्या पर्यावरणासाठी धोकादायक ठरू लागल्या आहेत. या बाटल्यांची विल्हेवाट लावण्यासाठी कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) फंडातून तब्बल ५०० मशीन्स मुंबईतील विविध सार्वजनिक ठिकाणी बसविण्यात येणार आहेत.
यासाठी प्रत्येक प्रभागातील पर्यटनस्थळे, उद्याने, बाजार अशी सर्वाधिक वर्दळीची ठिकाणे शोधण्याचे आदेश संबंधित साहाय्यक आयुक्तांना पालिका आयुक्त अजय मेहता यांनी दिले आहेत.
महापालिका मुख्यालय व विभाग कार्यालयांमध्येही विविध बैठका व सभा होत असतात़
या बैठकांमध्ये यापूर्वी काचेच्या ग्लासमधून पाणी देण्यात येत होते़ मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये प्लॅस्टिकच्या बाटल्यांचा वापर सुरू झाला. या प्लॅस्टिक बाटल्या बंद करून काचेचा जग व पेपर ग्लास
वापरण्याची ताकीद आयुक्तांनी सर्व खातेप्रमुख व साहाय्यक आयुक्तांना दिली आहे़
सेलीब्रिटी देणार प्लॅस्टिक बंदीचा संदेश
प्लॅस्टिक जमा करण्यासाठी महापालिकेने प्लॅस्टिक एकत्र करणारी केंद्रे स्थापन केली. मात्र, त्याला नागरिकांकडून अत्यल्प प्रतिसाद मिळत होता. उच्च न्यायालयाने प्लॅस्टिक बंदीच्या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार दिल्यानंतर महापालिकेने प्लॅस्टिक बंदीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कृती आराखडा तयार केला आहे.
त्याचबरोबर प्लॅस्टिकचा वापर बंद करण्यास नागरिकांना प्रोत्साहित करण्यासाठी नामवंत व्यक्ती, सेलीब्रिटींद्वारे जनजागृती करण्यात येणार आहे.
तीन महिन्यांची मुदत
२३ जूनपर्यंत प्लॅस्टिक बंदी अमलात आणण्याची मुदत आहे. त्यामुळे आपल्या घरातील प्लॅस्टिक जमा करण्यासाठी नागरिकांची धावपळ उडेल. यासाठी प्लॅस्टिक जमा करण्याची केंद्रे वाढविण्याचा पालिकेचा विचार आहे.
...तर तुरुंगात जायला तयार व्हा
मुंबईत ५०० मि.ली.च्या ३८ लाख, तर पाचशे मि.ली.पेक्षा कमी असलेल्या २५ लाख प्लॅस्टिक बाटल्या आहेत.
मुंबईत प्लॅस्टिक कॅरी बॅग आणि प्लॅस्टिकच्या वस्तू बनविणारे ४५५ उत्पादक आहेत.
महापालिका मुख्यालय, गेटवे आॅफ इंडिया, सीएसएमटी, फोर्ट, नरिमन पॉइंट या ठिकाणी पाचशे बॉटल क्रशिंग मशीन बसविण्यात येणार आहेत.
प्लॅस्टिकचा वापर करणाऱ्याला पहिल्या वेळेस पाच हजार, दुसºया वेळेस १५ हजार, तिसºया वेळेला २५ हजार रुपये दंड व तीन महिन्यांचा तुरुंगवासही होणार आहे.