Join us

कोस्टल रोड पायाभूत सुविधांतील पुढचे पाऊल; सी-लिंकला जोडणाऱ्या पुलाचे उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2024 5:58 AM

भविष्यात मुंबई ते वर्सोवामधील ३-४ तासांचे अंतर हे केवळ ४० ते ५० मिनिटांत पार करण्यात येईल.

मुंबई - धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता प्रकल्प (दक्षिण) हा मुंबईसाठी गेमचेंजर प्रकल्प असून, यामुळे मुंबईकरांचा प्रवास सुखकारक, जलद, दिलासादायक आणि वेळेची बचत करणारा होणार आहे. हे मुंबईच्या पायाभूत सुविधा विकासातील पुढचे पाऊल असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी या प्रकल्पाच्या लोकार्पणसमयी सांगितले.

या प्रकल्पामुळे मरिन लाइन्स ते वांद्रे सी- लिंक हा प्रवास केवळ १० मिनिटांत पूर्ण होणार आहे. या लोकार्पणप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई शहर पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगर पालकमंत्री मंगलप्रभात लोढा उपस्थित होते. मुंबईतील गेमचेंजर ठरणारा हा सागरी किनारा प्रकल्प वर्सोवा, भाईंदर, विरारपर्यंत पुढे जाणार आहे. भविष्यात मुंबई ते वर्सोवामधील ३-४ तासांचे अंतर हे केवळ ४० ते ५० मिनिटांत पार करण्यात येईल. हा प्रकल्प बांधताना कोळी बांधवांचीदेखील काळजी घेण्यात आली आहे आणि त्यांनादेखील न्याय दिला आहे. या प्रकल्पाचा फायदा वाढवण बंदरालादेखील होणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यानंतर या प्रकल्पासाठी सर्व परवानग्या मिळाल्या आहेत. या प्रकल्पाचे ९० टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित कामेही लवकरच पूर्ण करण्यात येत असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले. हा प्रकल्प मरीन ड्राइव्ह ते वांद्रे-वरळी सागरी सेतूपर्यंत बांधण्यात येत आहे. तात्पुरत्या स्वरूपात वांद्रे-वरळी सागरी सेतूला जोडणाऱ्या दक्षिण वाहिनीवरील ८२७ मीटर लांबीच्या पुलावरून उत्तर वाहिनीवर सुरू होत असलेली वाहतूक सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते रात्री ११ वाजेपर्यंत सुरू राहील.

अजित पवार अनुपस्थितया कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार अनुपस्थित होते. त्याबाबत विचारणा केली असता, त्यांची काही कामे असल्याने ते येऊ शकले नाहीत. तसे त्यांनी आम्हला कळवले होते. त्यामुळे यातून कोणता राजकीय अर्थ काढू नये, असे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

पुढील नियोजन सद्य:स्थितीत प्रकल्पाचे ९२ टक्के काम पूर्ण, प्रकल्पातील वांद्रे-वरळी सागरी सेतूला जोडणारा उत्तर वाहिनीवरील मुख्य पूल व वरळी आंतरबदल डिसेंबर २०२४ पर्यंत, तर हाजीअली आंतरबदल येथील उर्वरित कामे मार्च २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट.

टॅग्स :एकनाथ शिंदे