Nawab Malik On Aryan Khan Case: मुंबईच्या समुद्रात क्रूझवर आयोजित पार्टीवर केलेली छापेमारी निव्वळ स्टंट असल्याचा दावा राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. एनसीबीकडून अटक करण्यात आलेल्या अरबाज मर्चंट आणि आर्यन खान यांना एनसीबीच्या कार्यालयात घेऊना जाताना दिसणारे व्यक्ती एनसीबीचे कर्मचारी नसून भाजपाचे कार्यकर्ते असल्याचं गौप्यस्फोट नवाब मलिक यांनी केला. यात त्यांनी काही फोटो आणि व्हिडिओ पत्रकार परिषदेत सादर केले आहे. एनसीबीनं केलेली कारवाई खोटी असून अभिनेता शाहरुख खान हा आपलं पुढचं टार्गेट असल्याचं अनेक क्राईम रिपोटर्सना महिनाभरअधीपासूनच सांगण्यात आलं होतं, असा खळबळजनक दावा नवाब मलिक यांनी केला आहे.
आर्यन खान आणि अरबाज मर्चंट यांना पकडून एनसबीच्या कार्यालयात घेऊन जातानाच्या एएनआयनं ट्विट केलेल्या व्हिडिओमध्ये दिसणारे व्यक्ती कोण होते याची माहिती नवाब मलिकांनी आज पत्रकार परिषदेत दिली. आर्यन खान प्रकरणात एका अधिकाऱ्याचा आर्यन खानसोबतचा एक सेल्फी प्रचंड व्हायरल झाला होता. हाच अधिकारी आर्यनला कारवाई केली त्या रात्री एनसीबीच्या कार्यालयात घेऊन जाताना दिसत होता. एनसीबीनं मात्र अधिकृतरित्या संबंधित व्यक्ती एनसीबीचा अधिकारी नसल्याचं जाहीर केलं होतं. आर्यनला घेऊन जाणारा व्हिडिओत दिसणारा व्यक्ती एनसीबीचा अधिकारी नव्हता, मग तो नेमका कोण होता? असा सवाल नवाब मलिक यांनी उपस्थित केला. इतकंच नव्हे, तर त्या व्यक्तीची कुंडलीच नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत मांडली.
आर्यन खानविरोधातील कारवाई हा निव्वळ फर्जीवाडा असल्याचा दावा मलिक यांनी केला आहे. पुढचं टार्गेट शाहरुख खान असल्याचं एक महिन्यापूर्वीच क्राईम रिपोटर्सना सांगण्यात आलं होतं. पत्रकारांना ऑफ द रेकॉर्ड ही माहिती देण्यात आली होती. आता पत्रकारांनीच हे पुढे येऊन सांगितलं पाहिजे, असं नवाब मलिक म्हणाले.
बॉलीवूड आणि राज्य सरकारला बदनाम करण्यासाठी अशाप्रकरच्या पब्लिसिटी स्टंट कारवाया केल्या जात आहेत. पब्लिसिटी हा आता एनसीबीचा मोठा खेळच झाला आहे. भाजप देशाच्या तपास संस्थांना हाताशी धरुन आपल्या कार्यकर्त्यांकरवी कारभार चालवला जात आहे, असा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.
नवाब मलिक यांची संपूर्ण पत्रकार परिषद पाहा: