Join us

शहरातील पुलांची फेरतपासणी तीन महिन्यांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 4:40 AM

हिमालय पूल दुर्घटनेनंतर प्रशासनाला आली जाग

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील दुर्घटनाग्रस्त पादचारी पूल चांगल्या स्थितीत असल्याचा अहवाल देणाऱ्या स्ट्रक्चरल आॅडिटर डी. डी. देसाई या कंपनीच्या अहवालाबाबत साशंकता व्यक्त होत आहे. त्यामुळे पूर्व आणि पश्चिम उपनगरांसह शहरातील सर्व पुलांची फेरतपासणी करण्यात येणार आहे. या कामासाठी नवीन स्ट्रक्चरल आॅडिटर नेमण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. नियुक्ती झाल्यानंतर या आॅडिटरला तीन महिन्यांमध्ये आपला अहवाल सादर करावा लागणार आहे.

छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानक येथील हिमालय हा पादचारी पूल १४ मार्च रोजी कोसळला. या दुर्घटनेत आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला असून, ३० नागरिक जखमी झाले आहेत. धोकादायक असलेला हिमालय पूल स्ट्रक्चरल आॅडिटर देसाई यांनी आपल्या आॅडिट अहवालात चांगल्या स्थितीत असल्याचे म्हटले होते. याप्रकरणी देसाईला अटक होऊन पालिकेतून त्याची हाकलपट्टी करण्यात आली आहे. त्यानंतर, आता प्रशासनाला जाग आली. मुंबईतील सर्व पुलांच्या पुनर्तपासणीचे आदेश आयुक्तांनी तत्काळ दिले होते.

परंतु शहर भागातील पुलांचे आॅडिट देसाईनेच केले असल्याने, या ठिकाणी नवीन स्ट्रक्चरल आॅडिटर नेमण्यात येणार आहे. यासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. या नवीन आॅडिटरला पावसाळ्यातील महिन्यासह तीन महिन्यांत शहरातील सर्व पुलांचे आॅडिट करून अहवाल सादर करावा लागणार आहे.या कामासाठी संबंधित आॅडिटरला ३० लाख रुपये मोबदला मिळणार आहे. तब्बल ८० पुलांचे आॅडिट या नवीन कंपनीला करावे लागणार आहे.
काम लांबणीवर पडण्याची भीती
डिसेंबर, २०१६ ते आॅगस्ट, २०१८ या कालावधीत देसाई कंपनीने शहरातील सर्व पुलांचे आॅडिट केले होते. या अहवालात देसाई कंपनीने हिमालय पुलाच्या किरकोळ दुरुस्तीची सूचना केली. मात्र, पूल कोसळला.च्हिमाल पूल कोसळल्यानंतर आता पूर्व आणि पश्चिम उपनगरातील पुलांचेही पुन्हा आॅडिट करण्यात येत आहे. त्यानुसार, पश्चिम उपनगरात दीडशे पुलांपैकी ७४ पुलांचे आॅडिट झाले आहे, तर पूर्व उपनगरात ६४ पैकी १८ पुलांची फेरतपासणी करण्यात आली आहे.च्पूल विभागातील ५५ अभियंत्यांपैकी ३५ अभियंता लोकसभा निवडणुकीच्या कामावर असल्याने, पुलांचे काम लांबणीवर पडण्याची भीती व्यक्त होत आहे.

टॅग्स :सीएसएमटी पादचारी पूल दुर्घटना