Join us  

पाकिस्तानींच्या पुढचे निघाले! भंगारातील स्प्रे बॉटल्समधून घरगुती गॅसची विक्री करत होते

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2023 11:31 AM

गुन्हे शाखा नियंत्रण पथकाची धाड, या पथकाने झोपडीत प्रवेश केल्यानंतर संबंधित ठिकाणी त्यांना दोन घरगुती गॅस सिलिंडर लोखंडी स्टॅण्डवर उलटे ठेवलेले दिसले.

- गौरी टेंबकर - कलगुटकरलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : भंगारातील स्प्रे बॉटल्समधून घरगुती सिलिंडरमधील एलपीजी गॅसची विक्री केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी उघडकीस आला आहे. याची विक्री करणाऱ्या निषार शरीफ खाँ (३२) या गॅस रिफिलिंग व्यापाऱ्याच्या मुसक्या आवळण्यात गुन्हे शाखा नियंत्रण पथकाला यश आले. याप्रकरणी डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.

ग्रँड रोडच्या मुरगा गिरण मज्जिदच्या समोर असलेल्या झोपड्यांमध्ये काही इसम घरगुती गॅस सिलिंडरमधील गॅस नोजल रेग्युलेटर मशीनच्या साहाय्याने भंगारमधून आणलेल्या बेगॉन, हिटच्या जुन्या रिकाम्या बॉटलमध्ये गॅस रिफील करून त्याची बेकायदेशीरपणे किरकोळ तसेच घाऊक स्वरूपात विक्री करत असल्याची माहिती प्रभारी पोलिस निरीक्षक नितीन पाटील यांना गुप्त बातमीदाराकडून मिळाली.

पोलिस उपायुक्त महेंद्र पंडित, पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक रुपेश दरेकर यांनी हवालदार वल्लेकर, जाधव, भंडारी, शिपाई नितीन मगर यांच्यासह सदर ठिकाणी धाड टाकली. त्यावेळी डी.बी. मार्ग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप खुडे यांनी सहायक पोलिस निरीक्षक अनिल रोकडे  यांची अतिरिक्त मदत पाठवली, असे सांगितले. 

या पथकाने झोपडीत प्रवेश केल्यानंतर संबंधित ठिकाणी त्यांना दोन घरगुती गॅस सिलिंडर लोखंडी स्टॅण्डवर उलटे ठेवलेले दिसले. त्याच्या वॉलला पितळेचे चार तोंड असलेले नोझल रेगुलेटर बसवण्यात आले होते. ज्या मार्फत एक इसम घरगुती सिलेंडरमधील गॅस हा बेगॉन, हिट या जुन्या स्प्रेच्या बॉटलमध्ये भरत असल्याचे दिसले. 

 तर ४ घरगुती गॅस सिलिंडर, अस्ताव्यस्त पडलेल्या रिकामी आणि भरलेल्या स्प्रे बॉटल, बर्फ ठेवलेला टब, तसेच सफेद रंगाच्या गोण्यांमध्ये ठेवलेल्या रिकाम्या बॉटल्सही पाहिल्या. त्याने हे सिलिंडर कोणत्या एजन्सीकडून घेतल्या याबाबत त्याच्याकडे चौकशी सुरू असून गॅस रिफिलिंगबाबत त्याच्याकडे कोणताही परवाना नसल्याचे तपासात उघड झाले आहे. 

कशा रिफिल व्हायच्या स्प्रे बॉटल्स?भरलेला गॅस सिलिंडरच्या वॉलला चार तोंडी पितळेचे नोझल जोडून रिकाम्या स्प्रे बॉटल प्रथम पाण्यात बुडवून थंड करतात. त्यानंतर त्या बॉटलचे तोंड पितळी नोझलला लावून त्याद्वारे गॅस सिलिंडरमधील गॅस बाटल्यांमध्ये रिफील करून  बाटल्या बाजारात विकल्या जातात.

सोने वितळवण्यासाठी केला जातो वापरअटक आरोपी हा होलसेलर असून त्याच्याकडून तीन ते चार जण या बाटल्या किरकोळ स्वरूपात घेऊन जातात. विशेषतः त्या सोनारांना विक्री करतात. कारण सोने वितळवण्यासाठी याचा वापर होत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :गुन्हेगारीगॅस सिलेंडर