पुढील वर्षी पुन्हा गरजूंना एक हजार घरांचे गिफ्ट, म्हाडाची घोषणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 06:47 AM2017-11-11T06:47:52+5:302017-11-11T06:48:07+5:30
पुढील वर्षीच्या मे महिन्यात म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे तब्बल एक हजार घरांसाठी लॉटरी काढण्यात येणार असल्याची घोषणा गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी केली.
मुंबई : पुढील वर्षीच्या मे महिन्यात म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे तब्बल एक हजार घरांसाठी लॉटरी काढण्यात येणार असल्याची घोषणा गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी केली.
वांद्रे पश्चिमेकडील रंगशारदा सभागृहात शुक्रवारी रवींद्र वायकर यांच्या उपस्थितीत म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे ८१९ घरांसाठी सोडत काढण्यात आली. आजच्या म्हाडाच्या लॉटरीत ज्यांना घरे लागलेली नाहीत; अशांना मे महिन्यात पुन्हा एकदा संधी मिळणार आहे.
वांद्रे पश्चिमेकडील रंगशारदा सभागृहात म्हाडाच्या घरांची सोडत पाहण्यासाठी अर्जदारांची तुफान गर्दी झाली होती. शिवाय सभागृहाखालील मोकळ्या जागेत अर्जदारांना निकाल पाहता यावा, यासाठी एलईडी स्क्रीनवर थेट प्रक्षेपण दाखविण्यात येत होते. संकेतस्थळावर ‘वेबकास्टिंग’ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सोडतीच्या कार्यक्रमाचे घरबसल्या थेट प्रक्षेपण बघण्याची सुविधा http://mhada.ucast.in या संकेतस्थळावर उपलब्ध होती. महत्त्वाचे म्हणजे http://www.facebook.com/mhadal2017 या लिंकवर सोडतीचे फेसबुक लाइव्ह प्रक्षेपण अर्जदारांना घरबसल्या बघायला मिळत होते. तर सोडतीचा निकाल सायंकाळी सहा वाजता https://lottery.mhada.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला.
दरम्यान, सोडतीच्या शुभारंभाप्रसंगी व्यासपीठावर शिक्षणमंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री विनोद तावडे, म्हाडाचे उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर आणि मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी सुभाष लाखे यांची प्रमुख उपस्थित होती. ढोल-तुतारीच्या निनादात सुरू झालेली सोडत पाहण्यासाठी अर्जदारांनी सभागृहात गर्दी केली होती. ८१९ सदनिकांच्या सोडतीसाठी ६५,१२६ अर्जदार पात्र ठरले होते.
म्हाडाची आणखी पाच हजार घरे
म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या ८१९ घरांसाठीच्या सोडतीचा आरंभ करण्यात आल्यानंतर व्यासपीठावर उपस्थित शिक्षणमंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री विनोद तावडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
तावडे म्हणाले, पंतप्रधान आवास योजनेंतर्गत राज्यात तब्बल अडीच लाख घरे बांधण्यात येणार आहेत. त्यापैकी पन्नास हजार घरे ही मुंबई महानगर प्रदेशात बांधली जातील.
रेडीरेकनरपेक्षाही म्हाडाची घरे स्वस्त असतात. रेडीरेकनरच्या दरापेक्षाही २५ टक्के म्हाडाची घरे स्वस्त आहेत. खासगी विकासकाच्या तुलनेत ही घरे स्वस्त आहेत. सर्वसामान्यांना परवडतील, अशी म्हाडाची घरे आहेत. गोरेगाव येथील पाच हजार घरांच्या बाबतीत बोलायचे झाल्यास जागेचा प्रश्न सुटलेला आहे. त्या जागेवर जवळजवळ तेवढीच घरे होतील. बांधकामाला पाचएक वर्षे गेल्यानंतर ही घरे नक्कीच बांधून होतील.
- रवींद्र वायकर, गृहनिर्माण राज्यमंत्री