पुढील वर्षी नागरिकांच्या अपेक्षेला, पसंतीला उतरेल असाच उत्सव साजरा व्हावा! नरेश दहिबावकर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2020 02:49 AM2020-08-31T02:49:29+5:302020-08-31T02:49:55+5:30

यंदा झालेल्या बदलाचा समाजावर काय परिणाम झाला, त्याचा पूर्णपणे अभ्यास करून गणेश मंडळांनी २०२१ला जो लोकांच्या अपेक्षेला आणि पसंतीला उतरेल असा लोकाभिमुख गणेशोत्सव साजरा व्हावा

Next year, a celebration should be held that meets the expectations and preferences of the citizens! Naresh Dahibawkar | पुढील वर्षी नागरिकांच्या अपेक्षेला, पसंतीला उतरेल असाच उत्सव साजरा व्हावा! नरेश दहिबावकर

पुढील वर्षी नागरिकांच्या अपेक्षेला, पसंतीला उतरेल असाच उत्सव साजरा व्हावा! नरेश दहिबावकर

Next

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव शांततेत साजरा केला जात असून विविध लोकाभिमुख उपक्रम राबविले जात आहेत. यंदा झालेल्या बदलाचा समाजावर काय परिणाम झाला, त्याचा पूर्णपणे अभ्यास करून गणेश मंडळांनी २०२१ला जो लोकांच्या अपेक्षेला आणि पसंतीला उतरेल असा लोकाभिमुख गणेशोत्सव साजरा व्हावा, अशी अपेक्षा बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष नरेश दहिबावकर यांनी व्यक्त केली.

दहिबावकर म्हणाले की, साधरणत: ४०-५० वर्षांपूर्वी गणेशोत्सव हा ज्ञानोत्सव म्हणून साजरा केला जात होता. यामध्ये वक्तृत्व स्पर्धा घेतली जात होती, वेगवेगळे वक्ते येत होते. मुलांच्या निबंध स्पर्धा, शारीरिक स्पर्धा होत असत. त्यात खंड पडून मध्यंतरीच्या काळात केवळ मनोरंजनावर आधारित कार्यक्रमावर भर दिला जात होता.

यंदा कोरोनाचे संकट आहे. लोकांच्या दृष्टीने जे अपेक्षित होते ते बदल पाहायला मिळत आहेत. पीओपीऐवजी शाडूच्या मूर्ती आल्या. यंदा मंडप छोटे होते, मूर्तीची उंची कमी करण्यात आली. आगमन, विसर्जन सोहळे नाहीत. इतकेच काय तर डीजेही लावत नाहीत. आता सगळा आरोग्योत्सव सुरू झाला आहे. कोरोनाच्या परिस्थितीमुळे बदल घडत आहे. आरोग्योत्सव राबविण्यात आला तो केवळ रक्तदान आणि प्लाझ्मादानापर्यंत मर्यादित राहिला नाही. कोरोनाच्या काळात लोकांच्या मनात नकारात्मकता निर्माण झाली होती.

योगा, व्यायामाचे कार्यक्रम राबवून नकारात्मकता बाहेर काढली. पुढील वर्षही लोकांच्या पसंतीस उतरेल असा गणेशोत्सव साजरा व्हायला हवा, असे दहिबावकर म्हणाले.

कोरोनामुळे जी परिस्थिती उदभवली आहे त्याचा गणेश मंडळांनी गांभीर्याने विचार करावा. उत्सव हा लोकांसाठी, समाजासाठी आहे याचे भान ठेवावे. दहा दिवस शांतपणे उत्सव साजरा केला त्याचप्रमाणे विसर्जनही शांततेत करावे. यासाठी मर्यादित लोकांनी उपस्थित राहावे तसेच महापालिकेने आणि मंडळांनीही कृत्रिम तलाव केले आहेत. त्यामुळे कृत्रिम तलावात गणेशमूर्ती विसर्जन करण्यावर भर द्यावा.
- नरेश दहिबावकर, अध्यक्ष, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समिती

यंदा गणेशमूर्ती बनवण्यात आली नव्हती. पारंपरिक चांदीची मूर्ती आहे तिची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे, त्याला साजेशी लहान सजावट केली. सजावटी आणि इतर बाबींवर होणारा खर्च जनआरोग्य वर्षासाठी केला जाणार आहे. सार्वजनिक कार्यक्रम न राबविता केवळ आरोग्यविषयक कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. पारंपरिक चांदीची मूर्ती असल्याने तिचे विसर्जन न करता प्रतीकात्मक (श्रीफळ आणि विडा) विसर्जन केले जाणार आहे. हे विसर्जन मंडपात होणार आहे.
- वासुदेव सावंत, मानद सचिव, चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा गणेशोत्सव साध्या पद्धतीने केला जात आहे. मंडपाची रुंदी आणि उंची कमी करण्यात आली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदा देखावा उभारला नाही. दोन गणेशमूर्ती असतात, पूजेची साडेतीन फुटांची, दुसरी सत्कारमूर्ती २२ फुटांची. पण यंदा केवळ पूजेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. ज्या ठिकाणी देखावा उभा केला जातो त्या ठिकाणी कृत्रिम तलाव तयार केला आहे, तिथे या मूर्तीचे विसर्जन करणार आहोत.
- किरण तावडे, अध्यक्ष, लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ (गणेश गल्ली)

Web Title: Next year, a celebration should be held that meets the expectations and preferences of the citizens! Naresh Dahibawkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.