मुंबई : खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आरक्षणामुळे फटका बसत असला, तरी त्यांना संधी मिळण्यासाठी पुढील वर्षी एमबीबीएसच्या सुमारे एक हजार जागा वाढविण्यासाठी प्रयत्न करू, अशी घोषणा वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी केली. तर, डॉक्टरांवरील हल्ले रोखण्यासाठी सध्याचा कायदा अधिक प्रभावी करण्यासाठी शिक्षेचे प्रमाण तीन वर्षांवरून सात वर्षांवर करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही सार्वजनिक आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. ‘लोकमत’तर्फे आयोजित ‘वेलनेस आयकॉन पुरस्कार २०१९’ सोहळ्यात बोलताना दोन्ही मंत्र्यांनी या घोषणा केल्या.
मुंबईत मुसळधार पाऊस पडत असतानाही परळ येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये ‘लोकमत वेलनेस आयकॉन’ पुरस्कार सोहळा रंगला. या सोहळ्यास वैद्यकीय क्षेत्रातील विविध मान्यवर आवर्जून उपस्थित होते. सिमंधर हर्बल प्रा. लि. आणि श्री धूतपापेश्वर लि. यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम पार पडला. वैद्यकीय तज्ज्ञांसाठी अशा स्वरूपाचा विशेष पुरस्कार सोहळा प्रथमच आयोजित करण्यात आला होता. आरोग्यसेवा क्षेत्रातील नामांकित ३१ वैद्यकीय तज्ज्ञांना पुरस्काराने गौरविण्यात आले.
या सोहळ्यात बोलताना, वैद्यकीय क्षेत्रातही पूर्वीच्या तुलनेत कालानुरुप अनेक बदल झाले आहेत. त्यामुळे रुग्ण व डॉक्टर हा संघर्ष टाळण्यासाठी मध्यममार्ग काढण्याची गरज असल्याचे मत महाजन यांनी व्यक्त केले. वैद्यकीय सेवेचेदेखील व्यावसायिकीकरण झाले आहे. देशात डॉक्टरांचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा कमी असल्याने डॉक्टरांवर कामाचा अधिक ताण पडत आहे. मात्र डॉक्टरांनीदेखील रुग्णाची मानसिकता समजून घेणे गरजेचे आहे. रुग्ण, त्यांचे नातेवाईक व डॉक्टरांच्या समुपदेशनाची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. डॉक्टर व रुग्ण हा संघर्ष टाळण्यासाठी केवळ कठोर कायदा करून किंवा १० वर्षांची शिक्षा देणारे कलम लावून चालणार नाही, तर त्यासाठी मानसिकता बदलण्याची गरज आहे, असे महाजन म्हणाले.
डॉक्टरांवरील हल्ले रोखण्यासाठी सध्याची तीन वर्षांची शिक्षा सात वर्षे करावी, जेणेकरून आरोपीला तत्काळ जामीन मिळणार नाही, अशी सूचना डॉ. तात्याराव लहाने यांनी केली. त्याला सार्वजनिक आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाठिंबा दर्शविला. याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलून राज्याच्या सध्याच्या कायद्यात त्यासाठी आवश्यक त्या सुधारणा करण्यात येतील व त्याबाबत केंद्र सरकारकडे आवश्यक ती शिफारस करण्यात येईल, अशी ग्वाही शिंदे यांनी दिली. डॉक्टरांवरील हल्ले रोखणे ही समाजाची व काळाची गरज आहे. यासाठी राज्य सरकार सकारात्मक निर्णय घेईल, असे शिंदे यांनी स्पष्ट केले. डॉक्टरांवरील हल्ले ही दुर्दैवी बाब आहे. प्रत्येक रुग्णाला बरे करण्यासाठी डॉक्टर झटत असतात; मात्र काही वेळा परिस्थिती हाताबाहेर जाते व त्याचा फटका डॉक्टरांना बसतो, असे ते म्हणाले.वैद्यकीय क्षेत्राची विश्वासार्हतापुरस्काराच्या निमित्ताने ‘वैद्यकीय क्षेत्र आजही विश्वासार्ह आहे’ या विषयावर आयोजित परिसंवादात वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने, परिवर्तन- द टर्निंग पॉइंट संस्थेचे ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. राजेंद्र बर्वे, टाटा मेमोरिअलच्या मेडिसिन आणि पीडीएट्रिक ऑन्कोलॉजी विभागप्रमुख डॉ. श्रीपाद बाणावली, कॉलेज ऑफ फिजिशिअन्स अॅण्ड सर्जन्सचे डॉ. गिरीश मैंदारकर, द योगा इन्स्टिट्यूूटच्या संचालिका डॉ. हंसा योगेंद्र, बॉम्बे रुग्णालयाचे फिजिशिअन डॉ. गौतम भन्साळी सहभागी झाले.‘लोकमत वेलनेस आयकॉन’चे प्रकाशनमंत्री गिरीश महाजन, एकनाथ शिंदे, डॉ. तात्याराव लहाने, डॉ. हंसा योगेंद्र, डॉ. गौतम भन्साळी, डॉ. गिरीश मैंदारकर यांच्या उपस्थितीत या वेळी ‘लोकमत वेलनेस आयकॉन २०१९’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. ‘वेलनेस आयकॉन’ म्हणून मुंबई परिसरातील प्रथितयश डॉक्टरांचा पुरस्काराने सन्मान करण्यात आला. अभिनेत्री डॉ. आदिती गोवित्रीकर यांनी ‘लोकमत’च्या या उपक्रमाचे कौतुक केले.