मलिष्काच्या समर्थनार्थ मुंबईत एनजीओची रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2017 04:39 PM2017-07-22T16:39:05+5:302017-07-22T16:39:05+5:30
मलिष्काच्या समर्थनार्थ मुंबईतील एक एनजीओ रस्त्यावर उतरलं होतं
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 22- आर.जे. मलिष्काने मुंबई महानगरपालिकेवर तयार केलेलं "मुंबई तुला बीएमसीवर नाय काय" हे गाणं सोशल मीडियावर सध्या चांगलंच गाजत आहे. मलिष्काने तयार केलंलं हे गाणं महापालिकेत सत्ता असणाऱ्या शिवसेनेच्या चांगलंच जिव्हारी लागलं होतं. शिवसेनेकडून मलिष्कावर टीका होत असताना तिला सर्व सामान्य लोकांचा तसंच काही राजकारण्यांचा पाठिंबा मिळाला. आता आर.जे मलिष्काच्या समर्थनार्थ मुंबईतील एक एनजीओ रस्त्यावर उतरलं होतं. शनिवारी सकाळी मुंबईत मलिष्काला पाठिंबा देण्यासाठी एक रॅली काढण्यात आली, इतकंच नाही तर रस्त्यावर असलेल्या पोलिसांना बाम भेट देण्यात आला.
आणखी वाचा
मुंबईत पावसाळा सुरू झाला की खड्ड्यांची समस्या मुंबईकरांना दरवर्षी भेडसावत असते. यामुळे वाहतुकीची कोंडी होणं, अपघात होणं या सगळ्या समस्यांना मुंबईकरांना दरवर्षी तोंड द्यावं लागतं. याच सगळ्या प्रकारावर भाष्य करत आर. जे. मलिष्कानं एक गाणं रचलं होतं. हे गाणं तयार करण्यासाठी मलिष्काने ‘सोनू तुझा माझ्यावर भरवसा नाही का?’ या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओतील गाण्याचा आधार घेतला. मलिष्काने गाण्यात मांडलेले मुद्दे सर्वसामान्य लोकांना पटले पण शिवसेनेने मात्र त्यावर कडाडून टीका केली. "आज तक" या वृत्तवाहिनीने ही बातमी दिली आहे.
शनिवारी सकाळी अंधेरीतल्या रस्त्यांवर एनजीओच्या काही सदस्यांनी खड्ड्यांची पाहणी केली होती. त्या सगळ्या सदस्यांनी मलिष्काचा फोटो असलेले मास्क लावले होते. तसंच या सगळ्याच आंदोलकांनी वाहतूक पोलिसांना "बाम" भेट दिला.
मलिष्कावर ५०० कोटींचा दावा
रेडिओ जॉकी मलिष्का आणि ९३.५ रेड एफएमवर ५०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्याची मागणी शिवसेनेने पालिका आयुक्त अजय मेहता यांच्याकडे केली आहे. पालिकेला मानसिक त्रास देण्यासाठी व पालिका कर्मचाऱ्यांचे खच्चीकरण करण्यासाठी हे गाणं रचण्यात आल्याचा दावा सेनेने केला. मुंबई महापालिकेची बदनामी केल्याप्रकरणी ५०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्यात यावा, अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक समाधान सरवणकर आणि अमेय घोले यांनी केली.
नितेश राणेंकडून पाठिंबा
काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी मलिष्काप्रकरणी ट्विटरच्या माध्यमातून सेनेची खिल्ली उडवली. ‘मलिष्का तू एकटी नाही. आम्ही आहोत तुझ्या बरोबर.. वाघोबा करतो म्याव म्याव.. आम्ही आणि मलिष्का बहीण भाव!!’, असे ट्विट करत राणे यांनी मलिष्काला आपला पाठिंबा जाहीर केला
मलिष्काला भाजपची साथ
मुंबई महापालिकेवरील टीकेत भाजपनं मलिष्काला साथ दिली आहे. मलिष्काने ज्या पद्धतीने मुंबईकरांची समस्या लोकांच्या समोर आणली त्यासाठी तिची स्तुती करावी तेवढी थोडी आहे, असं मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी म्हंटलं होतं. ट्विटकरून आशिष शेलार यांनी मलिष्काला पाठिंबा दिला.