ठाणे - मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गावरील आणंद आणि साबरमती या स्थानकांदरम्यान १८ किमी लांबीच्या व्हायाडक्टबरोबरच अहमदाबाद आणि साबरमती या स्थानकांच्या उभारणीसाठी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाची कार्यान्वयन यंत्रणा असलेल्या नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (एनएचएसआरसीएल) यांनी निविदा मागविल्या आहेत. बुलेट ट्रेन मार्गावर ३१ क्रॉसिंग ब्रिज बांधण्यात येणार असून त्यात सहा स्टील ट्रस ब्रिजचा समावेश असेल. गेल्या काही दिवसांत एनएचएसआरसीएलने प्रकल्पाच्या एकूण ५०८ किमी लांबीपैकी ६४ टक्के लांबीच्या (३२५ किमी) कामासाठी तीन तांत्रिक निविदा खुल्या केल्या आहेत. त्यात बुलेट ट्रेन मार्गावर बांधण्यात येणा-या १२ स्थानकांपैकी वापी, बिलिमोरा, सुरत, भरूच आणि आणंद/नडियाद या पाच स्थानकांच्या बांधकामाचाही समावेश आहे. अहमदाबाद स्थानक पश्चिम रेल्वेवरील अहमदाबाद जंक्शन रेल्वे स्थानकातून बुलेट ट्रेन मार्गाची सुरुवात होईल आणि विद्यमान अहमदाबाद स्थानकाच्या सारसपूर भागाकडे हा मार्ग एकात्म असेल. बुलेट ट्रेन मार्गावरील अहमदाबाद स्थानक सध्याच्या फलाट क्रमांक ११ आणि १२ वर उभारण्यात येईल. बुलेट ट्रेन स्थानकाचे रेल्वे वाहतुकीच्या इतर यंत्रणांबरोबर सहज एकरूपीकरण व्हावे यासाठी अहमदाबाद स्थानकाचा वापरकर्तास्नेही आराखडा एनएचएसआरसीएलने तयार केला आहे. प्रवाशांना नेहमीच्या तसेच बुलेट ट्रेनच्या स्थानकाकडे जाणे सुलभ व्हावे यासाठी विद्यमान अहमदाबाद रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला एकात्मिक इमारतीची उभारणी केली जाणार आहे. या इमारतीत उद्वाहिका आणि सरकते जिने यांचा समावेश असेल. तसेच तिकीट बुकिंग कार्यालय, पॅसेंजर लॉबी, चहा-कॉफीचे किऑस्क आणि इतरही सोयिसुविधा या इमारतीत असतील. प्रवाशांच्या येण्या-जाण्यात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी एकात्मिक इमारतीतून पश्चिम रेल्वेवरील विद्यमान पादचारी पूल जोडला जाईल, अशी व्यवस्था केली जाणार आहे. त्यामुळे स्थानकातील विद्यमान फलाट आणि सारसपूर बाजूकडील भूमिगत मेट्रो स्थानकात प्रवाशांना सहजगत्या जाता येईल. विद्यमान रेल्वेमार्गावर बुलेट ट्रेन स्थानकाची उभारणी करणे हे आव्हानात्मक काम आहे. केवळ रेल्वेमार्गच नव्हे तर फलाटावरील छते, कार्यालये, सिग्नल आणि टेलिकॉम केबल्स, जलवाहिन्या, वीजवाहिन्या, ट्रॅक्स इत्यादींचीही या ठिकाणी उपस्थिती असून हे सर्व अन्यत्र हलविण्याचे काम प्रगतिपथावर आहे. अहमदाबाद रेल्वे स्थानकाचे कार्यालय यापूर्वीच इतरत्र स्थलांतरित करण्यात आले आहे. बुलेट ट्रेनच्या अहमदाबाद स्थानकाचे बांधकाम अहमदाबाद मेट्रो स्थानकाच्या शेजारीच होणार आहे. त्यामुळे विद्यमान रेल्वे मार्गावरून कामगार, यंत्रे, अभियांत्रिकी साहित्य इत्यादींची प्रवाशांना गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेत ने-आण करणे तसेच अहमदाबाद रेल्वे स्थानकातून होणारी कार्गो व प्रवासी वाहतूक यांना बाधा येणार नाही, हे पाहणे इत्यादीही आव्हानात्मक आहे.साबरमती स्थानक मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गावरील टर्मिनल स्थानक म्हणून साबरमती स्थानकाचा विकास करण्याचा निर्धार एनएचएसआरसीएले केला आहे. परिसरातील एक अत्यंत सोयीचे आणि बहुविध वाहतुकीचे केंद्र म्हणून विकसित होणा-या साबरमती स्थानकाच्या विकासासाठी मल्टीमोडल ट्रान्झिट टर्मिनल स्थानकाच्या पूर्वेकडील बाजूस उभारण्याचे नियोजित आहे. त्यामुळे स्थानकातील प्रवाशांच्या हालचालींवर कोणतेही निर्बंध येणार नाहीत. मल्टीमोडल इंटिग्रेशन सिस्टीम विद्यमान आणि प्रस्तावित ट्रान्झिट सुविधांवर लक्ष केंद्रित करते. या ठिकाणी असलेल्या विद्यमान रस्त्यांच्या उपलब्ध मार्गिकांचा येत्या काळात या ठिकाणी होणा-या वाहतुकीच्या अंदाजाने वापर केला जाणार आहे. बुलेट ट्रेन मार्गावरील साबरमती स्थानकात थेट प्रवेश करता यावा यासाठी नवीन रोड अंडर ब्रिजची (आरयूबी) यापूर्वीच उभारणी करण्यात आली आहे. त्यामुळे प्रस्तावित स्थानकाच्या बांधकामात सध्याच्या रेल्वे जाळ्याचा कोणताही अडथळा ठरणार नाही. - सुषमा गौरप्रवक्ता/एनएचएसआरसीएल
१८ किमी व्हायाडक्टसह अहमदाबाद आणि साबरमती स्थानकांच्या उभारणीसाठी एनएचएसआरसीएलने मागवल्या निविदा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2020 8:03 PM