मुंबई - आपल्या हटके विदर्भीय स्टाईलने शिकविण्यासाठी सोशल मीडियावर ‘खदखद’ मास्तर म्हणून प्रसिद्ध असलेल्या वर्धा जिल्ह्यातील नितेश कराळे राजकारणात प्रवेश करणार अशी चर्चा अनेक दिवसांपासून आहे. समाज माध्यमांवर त्यांचे लाखो फालोअर्स असून कराळे यांच्या व्हिडीओंची सर्वत्र चर्चाही होत असते. नुकतेच मुंबईतील मातोश्री बंगल्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी गेलेल्या कराळे मास्तरांना भेट नाकारण्यात आली. त्यामुळे, कराळे यांनी शिवसेनेबद्दल खदखद व्यक्त करत, कधी कधी वाटतं जे आमदार सोडून गेले ते योग्य होते का, असे म्हटले. आता, शिवसेनेकडून कराळे मास्तरांवर पलटवार करण्यात आला आहे.
नितेश कराळे यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेस पक्षात प्रवेश करून विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली होती. तर, आता लोकसभा निवडणुकांच्या इच्छुक उमेदवारांपैकी आपण एक असल्याचं मास्तरने म्हटले आहे. दरम्यान, सोमवारी ते नागपूरहून मुंबईत उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी आले होते. मात्र, त्यांना भेट नाकारल्यानंतर कराळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच, शिवसेना उद्धव ठाकरे गटावर टीका करताना, मातोश्रीवर चहापेक्षा कॅटली गरम असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. त्यावर, आता शिवसेनेच्य सोशल मीडिया समन्वयक अयोध्या पौळ यांनी प्रत्युत्तर दिलंय. ''आज कराळे मास्तर म्हणे, त्यांना गेलेल्या गद्दार लोकांवर विश्वास होत आहे. कराळे मास्तर आमच्या मराठवाड्यात एक म्हण प्रचलित आहे "नी नांदणारीला बारा बुद्द्या".. ज्या व्यक्तीला नांदायचे किंवा नादवायचे नसते त्यांच्याकडे लाखो कारणे असतात, तशीच काहीशी गत या गेलेल्या गद्दार लोकांची होती, असा पलटवार पौळ यांनी केला.
कराळे मास्तर आपला सत्तापिपासूपणा ऑगस्ट महिन्यात जेंव्हा आपण अंबादास दानवे दादा यांच्या ऑफिसमध्ये भेटलो होतो तेंव्हाच समजला होता. आपल्याला खूप ज्ञान आहे अन् बाकी दुनिया अज्ञानी असा तुमचा कायमच समज राहिलेला आहे. असाल ही तुम्ही ज्ञानी पण तुम्ही मातोश्रीच्या गेटवर जाऊन आमचे आदरणीय साहेब यांच्यावर ज्ञान पाजळावे इतकी लायकी तर नक्कीच नाही. मातोश्री म्हणजे देशाचं केंद्रबिंदू, मातोश्री म्हणजे महाराष्ट्राचा आत्मा, मातोश्री म्हणजे आम्हा शिवसैनिकांसाठी मंदीर. यानंतर आपल्या लायकीत राहून मातोश्रीवर बोला कराळे मास्तर, असा इशाराच शिवसेनेच्या पौळ यांनी कराळे मास्तरला दिला आहे.
काय म्हणाले होते कराळे मास्तर
नुकतेच, त्यांनी विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निकालावर व्हिडिओ बनवून कायदेशीररित्या त्याची समीक्षाही केली. या व्हिडिओला ६०-साठ लाख व्हूज मिळाले आहेत. त्याच अनुषंगाने मला उद्धव ठाकरेंची भेट घेऊन ५ मिनिटे चर्चा करायची होती. त्यासाठी, म्हात्रेंचा संपर्क मिळाला, त्यांच्याशी फोनवरुन संपर्क झाल्यानंतरही आज त्यांनी माझे फोन घेतले नाही. याउलट मातोश्रीबाहेर त्यांची भेट झाली. मात्र, तरीही त्यांनी मला उद्धव ठाकरेंची भेट नाकारली. नितेश कराळे हे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या ओएसडींच्या माध्यमातून मुंबईतील मातोश्री बंगल्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी गेले होते. आपण, सकाळी ७ वाजता मातोश्रीवर पोहोचलो, पण अद्यापही आपणास भेट देण्यात आली नाही. विशेष म्हणजे शिवसेना व शिंदे यांच्यातील वादानंतर मी अनेकदा व्हिडिओच्या माध्यमातून शिवसेनेबद्दल सहानुभूती दर्शवली आहे.
४० आमदार पळून गेले ते योग्य होते?
मी तुमच्या बाजुने एवढे सहानुभूतीचे व्हिडिओ घेतो. भाजपला शिंगावर घेणारा एवढा कोणताच नेता नाही. त्यातूनच मी सहानुभूतीची चर्चा करायला आलो होतो. पण, मला इथं जाणवलं की, बरेच शिवसैनिक इथं भेटायला येतात, त्यांना बसायला जागा नाही, चहा-पाण्याची व्यवस्था नाही, लघवीला जायची जागा नाही. सर्वसामान्य माणूस बाळासाहेब ठाकरेंचं नाव ऐकून, त्या श्रद्धेनं इथं येतो. आम्हालाही शिवसेनेबद्दल निष्ठा आहे, जे निष्ठा सोडून गेले त्यांनी चुकीचं केलं. पण, इथं आल्यावर दिवसभरातील ५ मिनिटं हे मला भेटले नाहीत. पुढील महिन्यात तुम्ही आदित्य ठाकरेंची भेट घ्या, असे ते म्हणाले. मला दिवसभरातील ५ मिनिटांचा वेळ मिळाला नाही, माझे व्हिडिओ बरेच लोकं पाहातात, राजकीय नेते विधानसभेत त्यावरुन प्रश्न विचारतात. मग, माझ्यासारख्यांसाठी ५ मिनिटांचा वेळ नाही. तर, शिवसैनिकांसाठी वेळ आहे का, मग हा पक्ष वाढेन का?, असा प्रश्न कराळे मास्तरांनी विचारला. तसेच, कधी कधी असं वाटतं हे जे ४० आमदार पळून गेले हे योग्य होते का, असंही कराळे मास्तर म्हणाले.