एनआयएच्या अटकेतील निरीक्षक सुनील माने निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:06 AM2021-04-25T04:06:27+5:302021-04-25T04:06:27+5:30
*स्फोटक कार व मनसुख हिरेनच्या हत्येत सहभाग फेरा जिलेटीनचा लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : उद्याेगपती मुकेश अंबानी यांंच्या ॲंटिलिया ...
*स्फोटक कार व मनसुख हिरेनच्या हत्येत सहभाग
फेरा जिलेटीनचा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : उद्याेगपती मुकेश अंबानी यांंच्या ॲंटिलिया निवासस्थानाजवळ सापडलेली स्फोटकांनी भरलेली कार तसेच ठाण्याचे व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या हत्येप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) अटक केलेल्या पोलीस निरीक्षक सुनील मानेला मुंबई पोलीस दलातून निलंबित करण्यात आले आहे. त्याबाबतचे आदेश शनिवारी जारी करण्यात आले.
गेल्या पंधरवड्यापासून सशस्त्र दलात कार्यरत असलेल्या मानेला एनआयएने शुक्रवारी सकाळी अटक केली होती. त्याला २८ एप्रिलपर्यंत कोठडी सुनावण्यात आली. स्फोटक कार व मनसुख हिरेन हत्या प्रकरणात मुख्य आरोपी असलेला निलंबित एपीआय सचिन वाझेशी मानेची विशेष सलगी होती. माने हा कांदिवली गुन्हे शाखेचा (कक्ष ११) प्रभारी हाेता. मनसुख प्रकरणानंतर २, ३ व ४ मार्च रोजी मुंबई आयुक्तालयात येऊन ताे सीआययू कार्यालयात वाझेला भेटला होता. मनसुख यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीवेळी तो हजर होता. त्यानंतर त्याच्या हत्येमध्येही माने याने वाझेच्या सांगण्यानुसार महत्त्वाची भूमिका बजावल्याचे एनआयएच्या तपासातून स्पष्ट झाल्याने त्याला शुक्रवारी अटक करण्यात आली.