मुंबईत PFI वर NIA ची मोठी कारवाई; दिल्ली-यूपी, राजस्थानमध्येही अनेक ठिकाणी छापे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2023 09:21 AM2023-10-11T09:21:02+5:302023-10-11T09:22:06+5:30
दिल्ली-एनसीआरमध्ये अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. दुसरीकडे राजस्थानमधील टोंकसह अनेक ठिकाणी शोधमोहीम सुरू आहे. एनआयएने महाराष्ट्र आणि यूपीमध्येही छापे टाकले आहेत.
राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) विरोधात मोठी कारवाई केली आहे. तपास यंत्रणेने दिल्ली एनसीआर, यूपी, महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये पीएफआयशी संबंधित लोकांच्या अनेक ठिकाणांवर छापे टाकले आहेत.
दिल्लीतील हौज काझी पोलीस स्टेशनच्या बल्लीमारानमध्ये एनआयएचा छापा सुरू आहे. याशिवाय दिल्ली-एनसीआरमध्ये अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. दुसरीकडे राजस्थानमधील टोंकसह अनेक ठिकाणी शोधमोहीम सुरू आहे. एनआयएने महाराष्ट्र आणि यूपीमध्येही छापे टाकले आहेत.
मुंबईतील वाहिद शेखच्या घरावर छापा
पीएफआयशी संबंधित वाहिद शेखच्या घरावर छापा टाकण्यासाठी एनआयएचे पथक मुंबईतील विक्रोळीत पोहोचलं. मात्र, वाहिद शेख हे गेट उघडत नाही. तो म्हणतो की NIA अधिकाऱ्यांनी त्याला ओळखपत्र दाखवावे आणि कायदेशीर नोटीस पाठवावी, त्यानंतर तो त्याच्या वकिलाशी बोलेल. वाहिद शेखवर मुंबई हल्ल्याचा आरोप होता, मात्र नंतर त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली.
#WATCH | Maharashtra: NIA raids underway at the residence of acquitted accused of 7/11 train blasts Wahid Sheikh, in Vikhroli area of Mumbai. pic.twitter.com/DtFS1cEq3q
— ANI (@ANI) October 11, 2023
एनआयएचे पथक जुन्या दिल्लीतील बल्लीमारान येथील मुमताज बिल्डिंगमध्ये शोध घेत आहे. एनआयएसोबत स्थानिक पोलीसही तिथे आहेत. या इमारतीत धार्मिक साहित्य छापण्याचे काम सुरू असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर केंद्र सरकारने बंदी घातली आहे.
यूपीच्या अनेक शहरांमध्ये छापेमारी
उत्तर प्रदेशातील लखनौ, बाराबंकी, बहराइच, सीतापूर, हरदोई येथेही छापे टाकण्यात आले आहेत. लखनौमधील मदेगंज येथील बडी पकरिया भागातील तीन घरांवर छापे टाकण्यात आले आहेत. एनआयएच्या टीमसोबत सुरक्षा दल आणि स्थानिक पोलिसांची टीमही हजर आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.