Join us

दाऊद इब्राहिम व साथीदारांवर एनआयएचे आरोपपत्र दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2022 7:45 AM

कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम, त्याचा जवळचा साथीदार छोटा शकील व अटकेत असलेल्या तीन जणांविरोधात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) शनिवारी विशेष एनआयए न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.

मुंबई :

कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम, त्याचा जवळचा साथीदार छोटा शकील व अटकेत असलेल्या तीन जणांविरोधात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) शनिवारी विशेष एनआयए न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.

जागतिक दहशतवादी नेटवर्क आणि ‘डी’ कंपनी नावाच्या आंतरराष्ट्रीय संघटित गुन्हेगारी संघटनेशी संबंधित प्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आले. ही कंपनी भारतामध्ये दहशतवादी कारवाया आणि विविध गुन्हेगारी कारवायांमध्ये सहभागी आहे. एनआयएने दि. ३ फेब्रुवारी रोजी याप्रकरणी  यूएपीए कायदा व मकोका अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मुंबईचे रहिवासी असलेले अरीफ अबुबकर शेख, शब्बीर अबुबकर शेख आणि मोहम्मद सलीम कुरेशी या तिघांवरही आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

डी कंपनीचे सदस्य असलेले आरोपी बेकायदेशीर हालचाली करून गुन्हेगारी कारवाया करण्याचा कट रचत होते, असा दावा एनआयएने केला आहे. दहशतवादी कारवायांसाठी लोकांना धमकावून निधी जमा करण्याचे काम आरोपींनी केले. देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण करून सामान्य जनतेच्या मनात दहशत निर्माण करण्याचा हेतू या कारवायांमागे आहे, असे एनआयएचे म्हणणे आहे. आरोपींना हवालाद्वारे मोठी रक्कम पाठविण्यात आल्याचा दावा एनआयएने केला आहे.

टॅग्स :दाऊद इब्राहिम