मुंबई : प्रख्यात उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबई येथील निवासस्थानाबाहेर उभ्या करण्यात आलेल्या गाडीत जिलेटिनच्या कांड्यांबरोबरच अंबानी कुटुंबीयांना ठार मारण्याची धमकी देणारे पत्रही सापडले आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तर दुसरीकडे, केंद्र सरकारने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली असून राष्ट्रीय तपास यंत्रणेस (एनआयए)समांतर तपास करण्यास सांगण्यात आले आहे.
राष्ट्रीय तपास यंत्रणेचे पथक शुक्रवारी मुंबईत दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. तसेच मुंबई पाेलिसांबराेबरही बैठक झाल्याची माहिती वरिष्ठ पाेलीस अधिकाऱ्यांनी दिली. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन गावदेवी पोलिसांसह गुन्हे शाखा, राज्य दहशतवादविरोधी पथक तसेच राष्ट्रीय तपास यंत्रणा पुढील तपास करीत आहे. गावदेवी पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरोधात जीवे मारण्याची धमकी देणे तसेच स्फोटके बाळगणे या प्रकरणी गुन्हा नोंदविला आहे.
नागपूरहून आल्या जिलेटिनच्या कांड्या
जिलेटिनच्या कांड्यांवर नागपूरच्या सोलर इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड या कंपनीचे नाव आहे. त्यादृष्टीने पोलीस आता तपास करीत आहेत.
‘नीता भाभी-मुकेश भय्या, ही तर एक झलक’!
मुकेश अंबानी यांना उद्देशून असलेल्या धमकीपत्रात ‘मुकेश भय्या-नीता भाभी, ही तर एक झलक’ असल्याचे म्हटले आहे. ‘पुढच्या वेळी पूर्ण सामान घेऊन येईन. तुमच्या संपूर्ण कुटुंबाला उडवण्याची व्यवस्था केली गेली आहे’, अशा आशयाचा मजकूर लिहिले आहे.
काय होते गाडीत?
गाडीमध्ये ‘मुंबई इंडियन’ असे लिहिलेल्या बॅगेत धमकीचे पत्र, २०-२५ जिलेटिनच्या कांड्या आणि ठाणे, मुंबई येथील नोंदणी असलेल्या चार बनावट नंबर प्लेट मिळाल्या.
गाडी चोरीची
अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर उभी करून ठेवलेली स्कॉर्पिओ गाडी ही चोरीला गेल्याची तक्रार १८ फेब्रुवारी २०२१ रोजी विक्रोळी पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आलेली आहे. स्टेअरिंग जाम झाल्यामुळे ऐरोली येथे उभी केलेली ही गाडी दुसऱ्या दिवशी चोरीला गेली होती.