Join us

एनआयएने वाझेवर दाखल केले दोषारोपपत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2021 4:10 AM

मुंबई : अंटालियाजवळील कारमधील स्फोटके व व्यावसायिक मनसुख हिरेन हत्येप्रकरणी एनआयएने निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याच्यावर दोषारोपपत्र दाखल ...

मुंबई : अंटालियाजवळील कारमधील स्फोटके व व्यावसायिक मनसुख हिरेन हत्येप्रकरणी एनआयएने निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याच्यावर दोषारोपपत्र दाखल केले. एनआयएने दोन दिवसांपूर्वी विशेष न्यायालयात हे दोषारोपपत्र दाखल केले.

सचिन वाझे याच्यासह एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा, विनायक शिंदे, नरेश गोर, रियाझुद्दीन काझी, सुनील माने, आनंद जाधव, सतीश मतकरी, मनीष सोनी आणि संतोष शेलार यांच्यावर ९००० पानांचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. हे सर्व आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. दोनच दिवसांपूर्वी एनआयएने दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयाने गेल्या महिन्यात दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी एनआयएला ३० दिवसांची मुदत दिली होती. ही मुदत संपण्यापूर्वी एनआयएने विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ २५ फेब्रुवारी रोजी स्फोटकांनी भरलेली एसयुव्ही सापडली. ती एसयुव्ही सचिन वाझे यानेच तिथे ठेवल्याचा दावा एनआयएने केला. तसेच या एसयुव्हीचा मालक व ठाण्यातील व्यावसायिक मनसुख हिरेन याची हत्या करण्यामागेही वाझे याचा हात असल्याचा दावा एनआयएने केला आहे.

या सर्व आरोपींवर हत्या करणे, कट रचणे, अपहरण, स्फोटकांबाबत निष्काळजीपणे वागणे तसेच यूएपीए, एक्सप्लोझिव्ह सबस्टान्स ॲक्ट अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

या आरोपपत्रात २०० साक्षीदारांची यादी आहे. महाराष्ट्र पोलिसांनी तीन वेगवेगळे दाखल केलेले गुन्हे एनआयएने एकत्र केले आहेत. दक्षिण मुंबई, विक्रोळी आणि मुंब्रा येथे नोंदवलेल्या गुन्ह्यांना एकत्र करण्यात आले आहे. तपास अद्याप सुरूच असल्याचे एनआयएने स्पष्ट केले आहे.