NIA ने माझा जबाब आपल्या शब्दांत लिहिला - हेडली
By Admin | Published: March 26, 2016 09:37 AM2016-03-26T09:37:44+5:302016-03-26T09:43:46+5:30
राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) माझा जबाब आपल्या शब्दांत लिहिला, त्यांनी माझी वाक्यं त्याच शब्दांमध्ये नोंदवली नाहीत असा गंभीर आरोप मुंबई 26/11 हल्ल्यातील माफीचा साक्षीदार डेविड हेडलीने केला आहे
>ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. २६ - राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) माझा जबाब आपल्या शब्दांत लिहिला, त्यांनी माझी वाक्यं त्याच शब्दांमध्ये नोंदवली नाहीत असा गंभीर आरोप मुंबई 26/11 हल्ल्यातील माफीचा साक्षीदार डेविड हेडलीने केला आहे. जबाब नोंद करुन झाल्यानंतर त्यांनी माझ्यासमोर तो कधीच वाचून दाखवला नाही. एनआयएने असं का केलं ? हे मी सांगू शकत नाही. कदाचित ते विसरले असतील अशी माहिती हेडलीने दिली आहे. 26/11 हल्ल्याप्रकरणी अमेरिकेत शिक्षा भोगत असलेल्या हेडलीची मुंबईच्या विशेष सत्र न्यायालयात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उलटतपासणी सुरु आहे.
2006 मध्ये लखवीने लष्कर-ए-तोयबाचा टॉप कमांडर म्हणून मुझम्मिल भटशी माझी ओळख करुन दिली होती. अक्षरधाम आणि इशरत जहाँ प्रकरणात मुझम्मिल भटचा सहभाग असल्याचंही मला लखवीने सांगितलं होतं. मुझम्मिलचे सर्व मोठे हल्ले फसले असं एनआयएला मी कधीच सांगितलं नसल्याचा दावा हेडलीने केला आहे.
लखवीने मला इशरत जहाँ प्रकरणाबद्दल सांगितलं पण मला अगोदरच वृत्तपत्रांमधून यासंबंधी माहिती मिळाली होती. तसंच इशरत जहाँची माहिती मी एनआयएच्या जबाबात दिली होती असं हेडलीन सांगितलं आहे. मात्र बचावपक्षाच्या वकिलांनी इशरत जहाँबद्दल हेडलीने एनआयएला सांगितलं नसल्याचा दावा न्यायालयात केला आहे. हेडली मात्र आपण एनआयएला इशरत जहाँबद्द्ल सांगितलं असल्याचा दावा करत आहे.
एनआयएने नोंद केलेल्या जबाबाची प्रत मी पहिल्यांदाच पाहत आहे, मी जे काही एनआयएला जबाबात सांगितलं होतं ते सर्व माझ्या लक्षात आहे त्यामुळे मी ते वाचलं नाही. एनआयएला मी लष्कर-ए-तोयबाची महिला शाखा असून अबु ऐमानची आई त्याची प्रमुख असल्याची माहिती देखील दिली होती असं हेडलीने उलटतपासणीदरम्यान न्यायालयात सांगितलं आहे.