लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अँटालिया स्फोटकेप्रकरणी आरोपी असलेला बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याच्या तिसऱ्या जामीन अर्जाला एनआयएने शुक्रवारी विरोध केला. न्यायालयाने वाढवून दिलेल्या मुदतीत आरोपपत्र दाखल केल्याचे एनआयएने न्यायालयाला सांगितले.
आरोपपत्र वेळेत दाखल न केल्याचे कारण देत वाझे याने आपली आपोआप जामिनावर सुटका व्हावी यासाठी तिसरा जामीन अर्ज विशेष न्यायालयात दाखल केला. वाझे याने ऑगस्ट महिन्यातही असा अर्ज केला होता. मात्र, त्याच्या अर्जात तथ्य नसल्याचे म्हणत व न्यायालयाचा मौल्यवान वेळ वाया घालवल्याचे म्हणत न्यायालयाने वाझे याचा जामीन अर्ज फेटाळला आणि त्याचवेळी एनआयएला आरोपपत्र सादर करण्यासाठी आणखी एका महिन्याची मुदत दिली. या तिसऱ्या अर्जाला विरोध करताना एनआयएने न्यायालयाला सांगितले की, तपास यंत्रणेने ३ सप्टेंबर रोजी आरोपपत्र सादर केले. त्यामुळे अर्जदार तपास अपूर्ण असल्याचा आरोप करू शकत नाही. त्यामुळे वाझेचा जामीन रद्द करणे योग्य आहे, असे एनआयएने न्यायालयाला सांगितले.