Sachin Vaze: हप्ता वसुलीतील सचिन वाझेचा हिस्सा आखाती देशात जायचा?; 'त्या' महिलेची चौकशी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2021 04:11 AM2021-04-04T04:11:49+5:302021-04-04T07:38:47+5:30

Sachin Vaze: ‘त्या’ महिलेकडून आर्थिक गुंतवणूक; एनआयएच्या चाैकशीतून उघडकीस

NIA questions woman suspected to have accompanied Sachin Vaze to posh Mumbai hotel | Sachin Vaze: हप्ता वसुलीतील सचिन वाझेचा हिस्सा आखाती देशात जायचा?; 'त्या' महिलेची चौकशी सुरू

Sachin Vaze: हप्ता वसुलीतील सचिन वाझेचा हिस्सा आखाती देशात जायचा?; 'त्या' महिलेची चौकशी सुरू

Next

मुंबई :  मीरा रोड येथील मीना जॉर्ज या महिलेच्या राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) केलेल्या चौकशीतून अनेक धक्कादायक माहिती समोर आली आहे. स्फोटक  कारप्रकरणी अटकेतील  निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेकडे वसुलीतून दरमहा जमा होणारी लाखोंची रक्कम मीना जॉर्ज ही महिला सांभाळत होती, त्यातील त्याच्या हिश्श्यातील काही रक्कम हवाल्याच्या माध्यमातून आखाती देशात पाठविल्याची शक्यता वर्तविली जात आहे. तिचा स्फोटक कार व मनसुख हिरेनच्या हत्येत सहभाग आहे का, याची माहिती घेतली  जात आहे.

वाझे हा हॉटेल ट्रायडंटमध्ये वास्तव्याला असताना त्याला भेटण्यासाठी वारंवार एक महिला आल्याचे तेथील हॉटेल व्यवस्थापनातील चौकशी व सीसीटीव्ही फुटेजच्या पडताळणीतून स्पष्ट झाले होते. तपासानंतर संबंधित  महिला मीरा रोडच्या सेवन इलेव्हन कॉम्प्लेक्समध्ये  सी विंगमधील रूम नंबर ४०१ मध्ये राहत असल्याचे समाेर आले. गेल्या काही दिवसांपासून हा फ्लॅट बंद होता. मूळची गुजरातची असलेली ही महिला गुरुवारी परतल्यानंतर एनआयएने तिच्याकडे चौकशी सुरू केली.

सुमारे १३ तास तिची चाैकशी केल्यानंतर पथकाने तिला ताब्यात घेऊन मुंबईतील  कार्यालयात आणले होते. रात्री उशिरा तिला सोडल्यानंतर शनिवारी पुन्हा चौकशीसाठी बाेलावले. मुंबईतील विविध बार, लॉजेस, पार्लर व अन्य ठिकाणाहून जमा झालेल्या रकमेतील वाझेचा ‘वाटा’ मीना हाताळत होती. त्याच्या सांगण्यावरून तिने काही रक्कम   गुंतवणूक करण्याबरोबरच हवाल्याच्या माध्यमातून आखाती देशात पाठविल्याची माहिती अधिकाऱ्यांना  मिळाली आहे. तिच्या चौकशीतून अनेक बाबी समोर येत आहेत. अंबानींच्या निवासस्थानाच्या परिसरात जिलेटिनच्या कांड्या असलेली स्काॅर्पिओ ठेवणे आणि मनसुख हिरेन यांच्या हत्येमध्ये तिचा काही सहभाग आहे का, तिला या गुन्ह्याची माहिती होती का, याबाबत माहिती घेण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

वाझेच्या वापरातील आठवी कार जप्त
मुंबई : सचिन वाझे वापरत असलेली आणखी एक मर्सिडीज एनआयएच्या पथकाने शनिवारी जप्त केली. आतापर्यंत त्याच्या एकूण आठ गाड्या जप्त केल्या आहेत. मात्र मनसुख हिरेन यांच्या हत्येशी संबंधित ऑडी व इको कारचा शोध घेण्यात तपास यंत्रणेला अद्याप यश आलेले नाही. त्याच्यासह अन्य गाड्यांचा शोध घेण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
महागड्या कारचा शौकीन असलेल्या वाझेकडे विविध कारचा ताफा होता. त्यापैकी अनेक इतरांच्या नावावर असून तो त्याचा वापर सोयीनुसार करत होता. एनआयएने ३ मर्सिडीज, २ इनोव्हा, स्काॅर्पिओ, आऊट लँडर अशा एकूण आठ गाड्या जप्त केल्या. पांढऱ्या रंगाची मर्सिडीज शनिवारी जप्त केली. 
वाझे हा निलंबित पाेलीस कर्मचारी विनायक शिंदेसमवेत ३ मार्चला ऑडी कारमधून  प्रवास करीत असलेलेले फुटेज वरळी सी-लिंक येथील टोल नाक्यावरील  मिळाले होते. ती  गाडी मात्र अद्याप सापडलेली नाही. शिंदे ती  चालवित होता, तर वाझे त्याच्या बाजूला बसला होता. त्या गाडीत ठाण्याचे उद्याेगपती मनसुख हिरेन यांच्या हत्येचा कट रचण्यात आला होता. अन्य गाड्याही शोधण्यात येत आहेत.

एनआयए कोठडीत ७ एप्रिलपर्यंत वाढ
विशेष न्यायालयाने शनिवारी वाझेच्या एनआयए कोठडीत ७ एप्रिलपर्यंत वाढ केली. स्फाेटक कारप्रकरणी त्याला १२ मार्चला अटक झाली. हिरेन यांच्या हत्या प्रकरणीही ताे आराेपी आहे. केवळ यूएपीएअंतर्गत तपास करायचा नाही तर अन्य संबंधित केसेसचाही तपास करायचा आहे, असे एनआयएने सांगितले. मंगळवारी एनआयएने नवी मुंबईतून जप्त केलेली महागडी कार वाझेच्या मालकीची आहे. विशेष न्यायालयाने वाझेला आवश्यक ते सर्व वैद्यकीय साहाय्य पुरविण्याचे तसेच त्याच्या प्रकृती संबंधी अहवाल ७ एप्रिलपर्यंत सादर करण्याचे निर्देश एनआयएला दिले.

Web Title: NIA questions woman suspected to have accompanied Sachin Vaze to posh Mumbai hotel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.