एनआयएने नव्याने नोंदविला वाझेच्या चालकाचा जबाब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:07 AM2021-04-21T04:07:03+5:302021-04-21T04:07:03+5:30
फेरा जिलेटिनचा लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : उद्याेगपती मुकेश अंबानी यांच्या ॲंटिलिया निवासस्थानाजवळ सापडलेल्या स्फाेटकांनी भरलेल्या कार प्रकरणात राष्ट्रीय ...
फेरा जिलेटिनचा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : उद्याेगपती मुकेश अंबानी यांच्या ॲंटिलिया निवासस्थानाजवळ सापडलेल्या स्फाेटकांनी भरलेल्या कार प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणे (एनआयए)कडून मुख्य आरोपी सचिन वाझेच्या खासगी चालकाला साक्षीदार बनविले जाणार असल्याचे समजते. त्या दृष्टीने अधिकाऱ्यांनी मंगळवारी त्याचा नव्याने जबाब नोंदविला.
निलंबित पाेलीस अधिकारी वाझेच्या सांगण्यावरून जिलेटिनच्या कांड्या ठेवण्यात आलेली कार त्याने अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ पार्क केली होती. त्यानंतर तो वाझेसाेबत इनोव्हामधून निघून गेला होता. त्या घटनेचा प्रत्यक्षदर्शी तोच एकमेव महत्त्वपूर्ण साक्षीदार आहे. त्यामुळे खटल्यामध्ये त्याची साक्ष महत्त्वाची ठरणार असल्याचे तपास अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
‘एनआयए’च्या गेल्या सव्वा महिन्याच्या तपासात वाझे आणि त्यांच्या साथीदारांकडून रचलेला कट आणि त्यांचा एक साथीदार मनसुख हिरेन यांच्या हत्येचा तपास जवळपास पूर्णत्वाला आणला आहे. या प्रकरणी वाझेसह चारजणांना अटक करण्यात आली आहे. २४ फेब्रुवारीला अँटलिया येथे स्काॅर्पिओ कार वाझेच्या खासगी चालकाने ठेवली होती. त्याच्यामागे वाझे हा स्वतः इनोव्हा घेऊन सोबत होता. तेथे गाडी सोडल्यानंतर वाझेने त्या चालकाला सोबत घेऊन ताे ठाणे येथे गेला होता. इनोव्हाची नंबरप्लेट बदलून रात्री पुन्हा तेथे येऊन त्याने स्काॅर्पिओत जिलेटिनच्या २० कांड्याचे बंडल व धमकीचे पत्र ठेवले होते, असे तपासात समाेर आले आहे.
..........................