‘एनआयए’ने ताब्यात घेतली स्फोटक कारच्या गुन्ह्याची कागदपत्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:07 AM2021-03-10T04:07:15+5:302021-03-10T04:07:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराच्या परिसरात आढळलेल्या स्फोटक कारच्या तपासाची कागदपत्रे मंगळवारी राष्ट्रीय ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराच्या परिसरात आढळलेल्या स्फोटक कारच्या तपासाची कागदपत्रे मंगळवारी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) पथकाकडे वर्ग करण्यात आली. एटीएसने त्याबाबत जप्त केलेल्या वस्तू, सीसीटीव्ही फुटेज व अन्य पुरावे ताब्यात घेतले.
गावदेवी पोलीस ठाण्यात याबाबत मूळ गुन्हा दाखल आहे. एनआयए या संदर्भात लवकरच मुंबई क्राईम ब्रँचच्या सीयूआय पथकाचे साहाय्यक निरीक्षक सचिन वाझे यांच्याकडून केलेल्या तपासाची माहिती घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
केंद्रीय गृह विभागाने हा तपास एटीएसकडून काढून घेऊन एनआयएला करण्याचे आदेश सोमवारी (दि. ८) दिले. त्यानुसार एनआयए मुंबई विभागातील एका पथकाने त्याबाबत कार्यवाही सुरू केली. मंगळवारी गुन्हा दाखल करण्यासंदर्भातील सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी एटीएसने केलेल्या तपासाची माहिती घेतली. गुन्ह्याच्या उकलीसाठी त्यांनी जमा केलेले पुरावे, जबाब व अन्य वस्तू जप्त केल्या. यासंबंधी घटनास्थळाची पाहणी करून संबंधितांकडे चौकशी करून नव्याने जबाब नोंदविले जाणार असल्याचे सांगण्यात आले.
अंबानी यांचे निवासस्थान अँटिलियापासून सुमारे ५०० मीटर अंतरावर, २५ फेब्रुवारी रोजी, महिंद्रा स्कॉर्पिओत २० जिलेटिनच्या कांड्या व धमकीचे पत्र सापडले होते. त्याचा तपास लागण्यापूर्वीच चोरलेल्या या कारचा मूळ मालक मनसुख हिरेन यांचा मृत्यू झाल्याने त्यामागील गूढ आणखी वाढले आहे.
....................