एनआयएच्या पथकाकडून वंदना सिनेमासमोरील दुकानांच्या सीसीटीव्हींची पडताळणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:10 AM2021-03-13T04:10:25+5:302021-03-13T04:10:25+5:30

मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा उभा केला घटनाक्रम : सलग तिसऱ्या दिवशी एटीएसने केली हिरेन कुटुंबीयांची चौकशी जितेंद्र कालेकर लोकमत ...

NIA team inspects CCTV of shops in front of Vandana Cinema | एनआयएच्या पथकाकडून वंदना सिनेमासमोरील दुकानांच्या सीसीटीव्हींची पडताळणी

एनआयएच्या पथकाकडून वंदना सिनेमासमोरील दुकानांच्या सीसीटीव्हींची पडताळणी

Next

मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा उभा केला घटनाक्रम : सलग तिसऱ्या दिवशी एटीएसने केली हिरेन कुटुंबीयांची चौकशी

जितेंद्र कालेकर

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : मनसुख हिरेन यांच्या हत्या प्रकरणात रोज वेगवेगळी माहिती समोर येत आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) आणि दहशतवादविरोधी पथक (एटीएस) या दोघांकडून एकमेकांशी निगडित असलेल्या प्रकरणांची चौकशी सुरू आहे. एनआयएने ठाण्यातील हिरेन यांचे दुकान असलेल्या वंदना सिनेमासमोरील दुकानांच्या परिसरातील अनेक सीसीटीव्हींची पडताळणी केली. तर एटीएसने शुक्रवारी पहाटेच्या सुमारास या हत्येबाबतचा घटनाक्रम उभा (रिक्रिएशन ऑफ सीन) करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सध्या मुंबईतील ‘अँटालिया’ इमारतीजवळ मिळालेल्या मोटार कारमधील स्फोटकांचा तपास एनआयएचे विशेष पोलीस महानिरीक्षक अनिल शुक्ला यांच्या पथकांकडून सुरू आहे. तर स्फोटके ठेवलेल्या मोटार कारचे मालक मनसुख हिरेन यांच्या हत्या प्रकरणाचा तपास मुंबई एटीएसकडून सुरू आहे. याच प्रश्नावरून राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर कुरघोडी करीत आहेत. गुरुवारी एनआयएच्या पथकाने ठाण्यातील ‘विजय पाम्स’ या इमारतीमधील हिरेन कुटुंबीयांची दुपारी तब्बल तीन तास चौकशी केली. या दरम्यान त्यांच्याकडून अनेक शक्यता आणि आरोपांबाबतची पडताळणी केली. मात्र, या चौकशीतील तपशिलाची अधिकृत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. शुक्रवारी (१२ मार्च) ठाण्यातील हिरेन यांचे क्लासिक मोटर्स हे दुकान असलेल्या वंदना सिनेमासमोरील दुकानांबाहेरील सीसीटीव्हींची पडताळणी त्यांनी केली. १ जानेवारी ते ५ मार्च २०२१ या काळात या दुकानामध्ये कोण कोण आले? संबंधित मनसुख यांच्याकडे असलेली ही स्कॉर्पिओ मोटार त्या ठिकाणी किती वेळा आली? कोण घेऊन आले? याची तपासणी केली. त्याचबरोबर एटीएसच्या एका पथकाने सलग तिसऱ्या दिवशी मनसुख यांची पत्नी विमला, मुलगा मित आणि भाऊ यांच्याकडे या हत्येशी निगडित काही महत्त्वपूर्ण माहिती घेतल्याचे सांगण्यात येते.

* घटनाक्रमाची जुळवणी

एटीएसच्या अन्य एका पथकाने गुरुवारी रात्री आणि शुक्रवारी पहाटेच्या सुमारास काही मच्छीमार, हवामान खात्याचे काही कर्मचारी आणि न्यायवैद्यक विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने घटनास्थळी पुन्हा भेट दिली. मनसुख यांच्या वजनाचा पुतळा मुंब्रा रेतीबंदर खाडीत फेकून तो कोणत्या दिशेने जातो, पाण्याचा प्रवाह कोणत्या भागाकडे जातो, याचीही पडताळणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

* मास्कभोवती मिळालेल्या रुमालांचे गौडबंगाल काय?

मनसुख यांचा मृतदेह मिळाला, त्या वेळी त्यांच्या तोंडाला असलेल्या मास्कच्या आत काही रुमाल मिळाले होते. त्याचा उल्लेख एटीएसच्या अधिकाऱ्याने आपल्या पंचनाम्यामध्ये करून मृतदेह काढतेवेळी ज्यांनी ते रुमाल पाहिले, त्यांची नव्याने चौकशी केल्याचे समजते. या रुमालांचे नेमके काय गौडबंगाल आहे? याचाही उलगडा आता एटीएसच्या पथकाला करावा लागणार आहे. मृतदेह काढतेवेळी रुमाल काढतानाच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओचीही पुन्हा पडताळणी केली जात असल्याचेही एका अधिकाऱ्याने सांगितले.

Web Title: NIA team inspects CCTV of shops in front of Vandana Cinema

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.