Join us

Nice Attack: मुंबईच्या रस्त्यावर फ्रान्स राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉनचे पोस्टर्स पायदळी तुडवले; रझा अकादमीचं कृत्य

By प्रविण मरगळे | Published: October 30, 2020 11:31 AM

France Nice Attack, Raza Academy News: मग मुंबईच्या रस्त्यांवर फ्रान्सच्या पंतप्रधानांचा अपमान का केला जातोय? असा सवाल भाजपानं उपस्थित केला आहे.

मुंबई – फ्रान्सच्या नीस शहरात झालेल्या हल्ल्याचे पडसाद मुंबई शहरात उमटले आहेत. कुराण हातात घेऊन चर्चमध्ये घुसलेल्या हल्लेखोराने ३ जणांनी निर्घुण हत्या केली. काही दिवसांपूर्वी मोहम्मद पैंगबराचं व्यंगचित्र काढल्याने फ्रान्समध्ये एका शालेय शिक्षकाचा शिरच्छेद करण्यात आला होता. त्यानंतर फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी धर्मांध मुस्लिमांविषयी कडक धोरण जाहीर केलं होतं. त्याचा निषेध मुंबईच्या रस्त्यावर करण्यात आला आहे.

मुंबईतील रझा अकदामीने गजबजलेल्या भेंडी बाजार परिसरात फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांचे पोस्टर्स रस्त्यांवर चिटकवले आहेत. रस्त्यावर ठिकठिकाणी असे पोस्टर्स पाहायला मिळत आहेत. या पोस्टर्सवरून वाहनांची आवाजावी सुरु आहे. मात्र या प्रकरानंतर भाजपा नेते संबित पात्रा यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. संबित पात्रा यांनी ट्विटमध्ये म्हटलंय की, महाराष्ट्र सरकार, तुमच्या राज्यात हे काय चाललं आहे? आज भारत फ्रान्ससोबत उभा आहे. जो जिहाद फ्रान्समध्ये होतोय, त्या दहशतवादाविरोधात भारताच्या पंतप्रधानांनी फ्रान्ससोबत असल्याची ग्वाही दिली आहे. मग मुंबईच्या रस्त्यांवर फ्रान्सच्या पंतप्रधानांचा अपमान का केला जातोय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

फ्रान्समध्ये काय घडलं?

नीसच्या चर्चमध्ये घुसून तीन जणांना ठार मारणारा व्यक्ती हा ट्युनिशियाचा नागरिक आहे. २० वर्षांचा हा मुलगा इटलीमार्गे फ्रान्समध्ये दाखल झाला होता. हल्लेखोर हातात कुराणच पुस्तक आणि चाकू घेऊन चर्चमध्ये घुसला होता असं तपासात आढळलं आहे.

या प्रकरणाचा तपास करणार्‍या दहशतवादविरोधी विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, हा माणूस भूमध्य सागरी भागातल्या लम्पेडुसा या बेटावरुन २० सप्टेंबरला इटलीला आला होता. त्यानंतर तो ९ ऑक्टोबर रोजी इटलीहून पॅरिसला पोहोचला. त्याच्या फ्रान्सला पोहोचल्याची माहिती इटालियन रेडक्रॉसच्या एका व्यक्तीच्या कागदपत्रातून समोर आली आहे. ट्युनिशियाच्या हल्लेखोराने हातात कुराण धरले होते. त्याने चर्चमध्ये प्रवेश केला आणि धारदार चाकूने लोकांवर हल्ला केला. नीस शहरात तीन महिन्यांत दोन दहशतवादी हल्ले झाले आहेत. या हल्ल्यांना इस्लामिक कट्टरतावादाशी जोडले जात आहे. पोलिसांच्या कारवाईत हल्लेखोर गंभीर जखमी झाला. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नीसमध्ये एका व्यक्तीने चाकूने वार करून तीन जणांना ठार केले. काही दिवसांपूर्वी पॅरिसमध्येही अशीच एक घटना घडली होती. या घटनेच्या पार्श्वभूमीवर अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन म्हणाले आहेत की, फ्रान्स पुन्हा 'दहशतवादी हल्ल्याचा बळी पडला आहे'. फ्रान्सवरील हल्ला देशाच्या स्वातंत्र्याचे मूल्य आणि दहशतीपुढे झुकू नयेत या उद्देशाने केला गेला. इतकेच नव्हे तर इस्लामिक दहशतवादी हल्ल्यानंतरही फ्रान्स आपली मूल्ये सोडणार नाही असंही त्यांनी म्हटलं आहे.

टॅग्स :फ्रान्स