मुंबई - गणेशोत्सवाची धूम अद्यापही सगळीकडे सुरू असून आता बाप्पांच्या विसर्जनाचीही तयारी सुरू झाली आहे. दीड दिवसांच्या, ५ दिवसांच्या गणरायाचे वाजत-गाजत, पण तितक्याच भावनिक वातावरणात विसर्जन करण्यात आले. पुढच्या वर्षी लवकर या म्हणत बाप्पांना निरोप देण्यात आला. सध्या सोशल मीडियावर कोल्हापूर महापालिका प्रशासनाकडून होत असलेल्या क्रेनद्वारे विसर्जन मूर्तींचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. अनेकांनी या विसर्जन पद्धतीचं कौतुक केलं आहे. मात्र, आमदार नितेश राणे यांनी हा आमच्या देवांचा अपमान असल्याचं म्हटलं. तसेच, कोल्हापूर महापालिका प्रशासनाला इशाराही दिला.
कोल्हापूर महापालिकेने गणेश विसर्जनासाठी अनोखी व्यवस्था केली असून इराणी खणीजवळ स्वयंचलित यंत्र उभारलं आहे. यंत्राद्वारे गणेश मूर्तींचे पाण्यात विसर्जन करण्यात येत आहे. हा वेगळा प्रयोग राज्यात पहिल्यांदाच होत असून तब्बल 83 लाख रुपये खर्चून महापालिकेने ही यंत्रणा इराणी खण येथे बसवली आहे. नागरिकांनी पर्यावरणपूरक पद्धतीने गणेश विसर्जन करावं, असं आवाहनही प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केलं आहे. मात्र, यावर भाजप आमदार नितेश राणे यांनी आक्षेप घेतला आहे.
कोल्हापूर प्रशासनाला आमच्या देवाचा अपमान करण्याचा अधिकार कोणी दिला? असा प्रश्न नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे. तसेच, सदरचा प्रकार वेळीच थांबवण्याची मागणीही राणेंनी केली. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन राणेंनी या विसर्जन पद्धतीचा व्हिडिओ ट्विट केला असून कोल्हापूर महापालिका प्रशासनाला इशाराच दिला आहे.
काय आहे संकल्पना आणि यंत्रणा
बाप्पांच्या विसर्जनासाठी खणीजवळ मोठ्या प्रमाणात गणेश मूर्ती गोळा होत असल्याने रात्री उशीरपर्यंत या मूर्ती खाली सोडण्याचे काम सुरू असते. त्यामुळे कामाला गती यावी व सुरक्षितरित्या मूर्तीचे विसर्जन व्हावं, यासाठी महानगरपालिकेच्या विसर्जनाचे स्वयंचलित यंत्र बसवण्यात आले आहे. त्यासाठी तब्बल 83 लाख रुपये किंमतीचे हे स्वयंचलित यंत्र असून याद्वारे गणेश मूर्ती पाण्यात सोडण्यात येत आहेत. हा राज्यातील पहिलाच प्रयोग आहे. यामुळे गणेश मूर्तींचे जलद गतीने व सुरक्षितरित्या विसर्जन होणार असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. सध्या या विसर्जन पद्धतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
एक सेकंदाला एका मूर्तीचं विसर्जन
स्वयंचलित यंत्राद्वारे खाणीत 35 फूट अंतरापर्यंत विसर्जन होणार आहे. विसर्जनासाठी महाराष्ट्रात प्रथमच अशा आधुनिक टेलीस्कोपिक कन्व्हेअर तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. या बेल्टची लांबी कमी-जास्त करता येत असून 180 अंशापर्यंत मशीन फिरू शकते. या तंत्रज्ञानामुळे 'एक सेकंदाला एक गणेश मूर्ती विसर्जित' करता येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.